Home नागपूर उपासमारीने त्रासलेल्या अपंगाची मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या

उपासमारीने त्रासलेल्या अपंगाची मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या

108 views
0
कामठी तालुक्यातील येरखेडा येथील घटना
विदर्भ वतन / कामठी : येथील नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कामठी कळमना मार्गावरील मरार टोलीतील भिवसेंन मंदिरात रामकृष्ण गंगाराम मात्रे (वय ५०) या इसमाने मंगळवार दिनांक १९ ला रात्रीच्या सुमारास मंदिराच्या लोखंडी दाराला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृतक हा धामणगावचा मूळ रहिवाशी होता तो काही वर्षांपूर्वी जेसीबी चालवित  असे. परंतु, काही कारणाने त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासूून लचकल्यामुळे त्याला वाहन चालविणे शक्य होत नव्हते अशातच घरी पत्नीशी जमेनासे झाल्याने पत्नी एक मुलगा व एक मुलीला घेऊन कामठी येथे आपल्या माहेरच्या मदतीने राहायला आली. रामकृष्ण मात्र धामनगावातच राहत असे. या दोघांची त्यांच्या नातेवाईकांनी समजूत काढून एकत्र नांदण्याचा सल्ला दिला.  त्यानुसार येरखेडा येथील मरारटोली येथे सासरच्या गावी मृतक राहावयास आला परंतु, त्याला पायाच्या व्याधीमुळे कोणतेही काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे तो आपल्या कुटुंबावरच विसंबून होता. काही दिवसांपासून त्याला घरच्यांनी जेवण देणे सुध्दा बंद केले. अशातच लॉकडाऊन ओढवल्याने सर्वांचीच दोन वेळेची वणवण सुरू झाली त्यामुळे रामकृष्णकडे देणार्यांचे पुर्णपणे दुर्लक्ष झाले.
परिसरातील लोकांनी सांगितले की, मागील तीन ते चार दिवसांपासून रामकृष्ण मानसीकदृष्ट्या त्रस्त होता. तो कळमना मार्गावरील कुवारा भिवसन देवस्थान सार्वजनिक मंदिर मरार टोली, येरखेडा येथे रात्री राहात असे. त्याला स्वत:च्या पायावर चालणे सुद्धा होत नव्हते. दोन्ही गुडधे जळलेल्या अवस्थेत असल्याने तो हाताच्या सहाय्याने जमिनीवर सरकुन चालत असे. मंगळवारच्या रात्री तो मंदिरात गेला आणि मंदिराच्या लोखंडी गेटला दोरी बांधून गळफास लावला. सकाळी त्या परिसरात पिण्याच्या पाण्याचे नळ सुरु झाले असता लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी याची सूचना नवीन कामठी पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदनाकरिता शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.