गुंडाचा खंडणी वसुलीसाठी हैदोस

293
आरोपीकडून पिस्तूल जप्त
विदर्भ वतन / नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून ताजबाग येथील कुख्यात राजा खान ऊर्फ क्रॅक याने खंडणी वसुलीसाठी उमरेड रोडवरील फूटपाथ दुकानदारांमध्ये दहशत पसरवली आहे. यातील एका दुकानदाराच्या घरात घुसून त्याला व त्याच्या आईला मारहाण केली. नंदनवन पोलिसांनी राजाला अटक करून त्याच्याजवळून पिस्तूल जप्त केले.
ठाकूर प्लॉट येथील राजा खान याची ताजाबाद येथे दहशत आहे. परिसरातील अनेक तरूण फळे आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. आतिक आणि मो.अहफाज यांनी लॉकडाऊननंतर टरबूजचे दुकान लावले. यानंतर राजा त्याला पाच हजार रूपये खंडणी मागत होता. पैसे न दिल्यास दुकान लावू देणार नसल्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत होता. खंडणी दिली नसल्यामुळे त्यांच्या दुकानातील सामानाची फेकफाक केली एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने अहफाजच्या घरावर हल्ला चढवून त्याला व त्याच्या आईला मारहाण केली. या घटनेची अहफाजचा भाऊ इर्शादने सक्करदरा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना एक पिस्तूल सापडले.