केंद्राकडून राज्याला मिळालेल्या निधीचा भाजपने मागीतला हिशोब

293
सामान्यांसाठी आर्थिक पॅकेजची केली मागणी
विदर्भ वतन / नागपूर : लॉकडाऊन काळातही राज्यात कोरोना बाधितांची रूग्णसंख्या वाढतच आहे. केंद्र शासनाने आधारभूत किमतीच्या आधारावर शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा उभी केल्यावरदेखील राज्याने शेतमाल खरेदी केला नाही. केंद्राने पाठविलेल्या निधीचादेखील विधायक उपयोग झालेला नाही. या निधीचा राज्याने हिशोब द्यावा अशी मागणी भाजपच्या महानगर पदाधिकार्यानी केली आहे. कोरोना संदर्भातील विविध समस्यांवर भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन दिले.
केंद्र शासनाने आखून दिलेल्या उपाययोजनांचे पालन राज्याला करताच आले नाही. राज्यात पीपीई किट्स आवश्यक प्रमाणात उपलब्ध नाहीत, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लोकांना मिळाले नाही, अडकलेले विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आवश्यक सुविधा नाहीत, लोक संकटात असताना महाविकास आघाडीतील नेते राजकारण करत असून प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट दाखविण्यात व्यस्त आहेत, असा आरोप या निवेदनातून करण्यात आला. राज्य शासनाने शेतकर्यांना तातडीने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानभरपाई द्यावी, सर्वसामान्य जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी खा. विकास महात्मे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. नागो गाणार, उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्षनेते संदीप जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.