आत्मा कार्यालयातील संगणक रुपरेषकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

243
जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ वतन / गोंदिया :  प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) या कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी वैभव मुंगले (संगणक रुपरेषक आज्ञावली) व मॉडल आॅटोमोबाईल येथील सेल्समन असलेला खासगी इसम रविकांत सुखराम रावते यांना १५ हजार रुपयाची लाच घेतांना गुरूवार दिनांक २१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारकर्ता हा कृषोन्नती धान उत्पादक शेतकरी गटाचा अध्यक्ष असून कारंजा येथील प्रकल्प संचालक कार्यालयात नोंदणीकृत आहे. त्यांनी नोंदणीकृत गटामार्फत शासनाकडून स्वयंचलीत धान कापणी यंत्र खरेदी करण्याचा ठराव पारीत करुन यंत्र मिळविण्यासाठी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाबाबत संगणक रुपरेष आज्ञावली पदावर कार्यरत वैभव मुंगले यांना विचारणा केली असता तक्रारदारास १ लाख ६५ हजार रुपये किमंत असल्याचे सांगून अनुदानाची रक्कम १ लाख ३५ हजार वगळता लाभार्थी रक्कम ३० हजार भरावे लागतील असे सांगितले. त्याव्यतिरिक्त आणखी २० हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा यंत्र मिळणार नसल्याचे सांगितले. तक्रारकर्त्याची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी १९ मे रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे विभागाने सापळा रचून कारवाई केली असता तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवत खासगी इसम रविकांत रावते याच्याकडे ही रक्कम देण्यास सांगण्यात आले. त्यावरुन मॉडल आॅटोमोबाईल येथे सापळा रचून खासगी व्यक्तीला वैभव मुंगलेच्या सागंण्यावरुन लाच घेतल्याने दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई उपअधिक्षक रमाकांत कोकाटे याच्या नेतृत्वात सहायक फौजदार शिवशंकर तुंबळे, विजय खोब्रागडे, प्रदिप तुळसकर,राजेश शेंद्रे, रंजित बिसेन, नितिन रहागंडाले, राजेंद्र बिसेन, गिता खोबाग्रडे, वंदना बिसेन, चालक देवानंद मारबते यांनी केली.