
एकुण रूग्णसंख्या २९
विदर्भ वतन / गोंदिया: गोंदिया शहरातील गणेशनगर परिसरातील एका तरूणाला कोरोना विषाणूची लागण झाली होती. उपचाराअंती त्याचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्याला घरी पाठविण्यात आले. गेल्या ३८ दिवसांपासून गोंदिया कोरोनामुक्त होता. त्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आला. परंतु,मंगळवार दिनांक १९ मे रोजी दोन तर गुरुवार दिनांक २१ ला २६ नवे रुग्ण आढळल्याने जिल्हा रेडझोनमध्ये गेला आहे. जिल्ह्यात आता एकूण कोरोना बाधितांची संख्या २९ झाली आहे.
१९ मे रोजी मुंबईहून जिल्ह्यात दाखल झालेल्या दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या दोन रुग्णांसोबत प्रवास करणार्या तसेच इतर एकुण ६१ नागरिकांच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यापैकी २६ पॉझिटिव्ह आणि एक नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. यापुर्वी गडचिरोली जिल्हयात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या आणि गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या ६१ नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हयात १९ मे रोजी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई येथून त्यांच्या सोबत प्रवास करणार्या सर्व नागरिकांचे संपर्क तपासण्यात आले आहेत.
त्यामुळे या सर्व नागरिकांना गोंदिया येथील कोरोना केयर सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल येथे विलगीकरण करण्यात आले आहे. हे सर्व नागरिक अर्जुनी-मोरगाव आणि सडक-अर्जुनी तालुक्यातील आहेत. २१ मे रोजी ५० नमुने तपासणीसाठी नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.
जिल्ह्यातील ४ विलगिकरण केंद्रातील कक्षात १७७ रुग्ण भरती आहे. त्याचबरोबर चांदोरी-४, लईटोला ५, तिरोडा १३, उपकेंद्र बिरसी ७, जलाराम लॉन गोंदिया ४, आदिवासी आश्रमशाळा, ईळदा ४३ आणि डवा येथील सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळेत ७ असे एकूण ८३ लोक संस्थात्मक अलगीकरण केंद्रात दाखल आहेत.

