अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोना रूग्ण आढळल्याने नागरिकांत दहशत

277
संतोष रोकडे
विदर्भ वतन / अर्जुनी मोर : गोंदिया जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. पुर्वीच्या तुलनेत आता जिल्ह्यात सुमारे  २९ नविन रुग्णांची भर पडली. दिनांक १५ मे रोजी मुंबईला रोजगारासाठी गेलेले मजूर एका ट्रकने जिल्ह्यातील आपापल्या गावी परतले त्यापैकी करांडली येथील एक मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने करांडली परिसर १९ मे पासून कंटेंटमेंट म्हणून जाहीर करण्यात आला.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील एका कोरोना बाधिताची सासुरवाडी अर्जुनी-मोर तालुक्यातील अरुणनगर येथे आहे. तो येथे येऊन गेल्याने दिनांक २१ मे पासून हा परिसर देखील कंटेंटमेट घोषित करण्यात आला. २१ मेच्या रात्रीपर्यंत अर्जुनी-मोर तालुक्यात जवळपास २५ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण तालुका दहशतीत आहे. अर्जुनी-मोर तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी मुबलक प्रमाणात असल्याने रब्बी हंगामात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या लहान कापणी बांधन करून चुरणे असी शेतीचे कामे सुरू आहेत. अजुनही रब्बी हंगाम सुरू असून अवघ्या काही दिवसात खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीला सुरूवात होणार आहे. अशा स्थितीत तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकर्यांच्या चिंचेची आणखीनच भर पडत आहे.
एसडीपीओ प्रशांत ढोले यांनी केली पाहणी
दिनांक २० मे रोजी देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी  करांडली येथे भेट देऊन पाहणी केली. आपत्कालीन समिती, ग्रामपंचायत प्रशासन यांना आवश्यक सूचना केल्या. तसेच दिनांक २१ ला कंटेंटमेट झोन अरुणनगर येथे भेट देऊन आपत्कालीन समिती व ग्रामपंचायत प्रशासनाला या काळात घ्यावयाची काळजी तसेच नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन एसडीपीओंनी केले.