अडकलेल्या कामगारांसाठी श्रमीक रेल्वे पुरेशा नाहीत

204
दररोज फक्त एक हजार कामगारांचीच रवानगी
विदर्भ वतन / नागपूर : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परराज्यातील कामगारांसाठी त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केंद्र शासनाने श्रमीक रेल्वेची घोषणा केली. पण अशा परिस्थितीत सुरू करण्यात आलेल्या या श्रमीक रेल्वे मोठ्या संख्येने अडकलेल्या कामगारांसाठी पुरेशा नाहीत. नागपूर रेल्वे स्टेशनवरून दररोज फक्त एक हजार कामगारांनाच प्रवास करता येत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ही सेवा अपुरी पडत आहे. उर्वरीत कामगारांना आपला नंबर केव्हा येईल याची दुसर्या दिवसापर्यंत वाट बधुन उपाशापोटी दिवस उजाडण्याची वाट बघावी लागत आहे.
मुळात अन्य राज्यातुन येथे कामगार मिळेल त्या साधनाने किंवा पायी चालत नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचत असल्यामुळे या कामगारांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे अजुनही शहरात हजारोच्या संख्येत कामगार अडकलेले आहेत. या कामगारांनी प्रवासासाठी आॅनलाईन अर्ज देखील भरलेले आहेत. हे कामगार रोज रेल्वे स्टेशनवर सकाळी ६ वाजेपासूनच लाईन लावून असतात. नंबर येईल या आशेवर हे कामगार दिवसभर उपाशीपोटी उन्हात उभे असतात शेवटी, ‘आज तुमचा नंबर लागला नाही, उद्या या’ हे उत्तर रेल्वे प्रशासनाकडून ऐकल्यावर हे कामगार दुसर्या दिवशी नंबर लागेल ही आस लावून तेथेच रात्र घालवतात. पुरेशा शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आॅनलाईन अर्ज भरणे ही या कामगारांपुढील मोठी समस्या आहे. या परिस्थितीमुळे कामगारांचे मानसीक संतुलन बिघडत चालले आहे. नागपूर रेल्वेस्थानकावरून रोज हजार ते बाराशेच कामगार प्रवास करू शकतात. उर्वरितांना ताटकळत बसावे लागते. रेल्वे प्रशासनाने कामगारांची ही दाहकता लक्षात घेता अधिक रेल्वे सोडाव्यात अशी मागणी या निमित्ताने पुढे येत आहे.