नाभिक व्यावसायीकांना सलून दुकाने सुरू करू द्या

300
नाभिक एकता मंच, नरखेडची मागणी
विदर्भ वतन / नरखेड : मार्च १९ पासून कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सतत लॉकडाऊन वाढविले जात आहे. या लॉकडाऊनमुळे सलून व्यवसाय पुर्णपणे उद्ध्वस्त झाला असुन कुटूंबाच्या उदरनिर्वाकरिता या व्यावसायीकांची वणवण सुरू झाली आहे. शासकीय मदत नावापुरतीच असल्याने ती पांढरा हत्ती ठरत आहे. अशावेळी नाभिक बांधवांना सन्मानाने जगता यावे याकरिता आम्हाला आपले व्यवसाय सुरू करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी नाभिक एकता मंच, नरखेडच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली.
ैॅैैैै यापुर्वी देखील राज्यभरातून या व्यावसायीकांनी आपल्या व्यथा शासनापुढे मांडलेल्या आहेत. मात्र, अजूनपर्यंत कोणतीच दखल घेण्यात आली नाही. निवेदनात कर्नाटक आणि उत्तरप्रदेशातील शासनाने नाभिक व्यावसायीकांना केलेल्या मदतीचा दाखला सुध्दा देण्यात आला पण विकासात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र शासनाला आमच्या बद्दल पाझर फुटला नाही. तालुक्यात अनेक व्यावसायीकांना काही लोक आपल्या घरी बोलावून कटींग-दाढी करून मागत आहेत म्हणजेच लपुन हे काम सुरूच आहे. तर प्रामाणीकपणे व्यवसाय सुरू करू देण्यात शासनाला काय हरकत? असा सवाल मंचच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. शिवाय इतर व्यवसायात बर्याच प्रमाणात शिथीलता देण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता सलून व्यावसायीकांवर हा एकप्रकारे अन्याय असल्याची व्यथा मंचने शासनाच्या निदर्शनात आणून दिली.
शासनाला जर सलुनची दुकानेच सुरू करू द्यायची नसेल तर कुटूंबाच्या उदरनिर्वाहाकरिता नरखेड तालुक्यातील सलून व्यावसायीकांना चिल्लर दारू विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी असा पर्याय देखील मंचने शासनापुढे ठेवला आहे.  सलुनची जास्तीत जास्त दुकाने ही भाड्याच्या जागेवर आहेत त्यामुळे दुकानाच्या भाड्याचे कर्ज देखील डोक्यावर बसले आहे त्यातच कुटूंबाचे पालनपोषन ही समस्या रोजच डोळ्यापुढे उभी राहात आहे. या लॉकडाऊनच्या काळात जशी अनेक अनावश्यक व्यवसायाला दुकाने सुरू करण्याची मुभा दिली, तशी आम्हालाही द्यावी किंवा मद्य विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी नाभिक एकता मंच, नरखेडचे अध्यक्ष राहुल कान्होलकर, सचिव रूपेश नागपुरकर, कमलेश नागपुरकर, प्रफुल नागपुरकर, संजय लक्षणे, रमेश धानोरकर, संदीप जिचकार, अतुल नागपुरकर, निलेश नागपुरकर यांनी केली.