स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करा 

305
पानगाव येथील शिधापत्रिका धारकांची  मागणी 
प्रतिनिधी
विदर्भ वतन / आमगाव :  तालुक्यातील पानगाव येथील धान्य दुकानदार मेघनाथ हनुजी बहेकार हे शिधापत्रिका धारकांना शासकीय नियमानुसार धान्याचे वाटप करीत नाही तसेच लाभार्थ्यांना पावती देत नाही, स्वस्त धान्य दुकानदाराला लाभार्थ्यांनी या संदर्भात विचारपूस केली असता त्याचेकडून उलट सुलट उत्तरे मिळतात तसेच धान्य देखील बरोबर दिल्या जात नाही त्यामुळे या दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी लाभार्थ्यांनी जिल्हाधिकार्याकडे केली.
या संदर्भात आमगाव येथील शिव मंदिर परिसरात पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी लाभार्थ्यानी रेशन दुकान चालक मेघनाथ बहेकर यांच्या मनमानीचा पाढाच पत्रकारांपुढे वाचुन दाखविला.  पिळवणूक झालेल्या लाभार्थ्यांनी सांगितले की, मागील ४० ते ४५ वर्षांपासून हा एकच इसम रेशन दुकान चालवीत आहे. सदर दुकानदार धान्य वाटपात घोळ करीत असल्याबद्दल यापूर्वी अनेकदा अन्न पुरवठा विभाग आमगाव येथे तक्रारी करण्यात आल्या होत्या पण जवाबदार अधिकारी प्रत्येकवेळी बहेकर यांना आपल्या कृपेच्या छत्रछायेत घेत राहिलेले आहेत. त्यामुळे अंत्योदय, बीपीएल, प्राधान्य कुंटुंब लाभार्थी तसेच एपीएल शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत होते.
दिनांक १३ एप्रिल २०२० ला लाभार्थ्यांनी धान्य दुकानदार मेघनाथ बहेकार यांची तक्रार तहसीलदार आमगाव यांना केली होती. १९ एप्रिलला आॅनलाइन तक्रार दाखल केली या संदर्भात २३ एप्रिल रोजी तहसीलदार व अन्न पुरवठा निरीक्षक यांनी तक्रारीची दखल घेत लाभार्थ्यांचे बयान घेतले व धान्य दुकानाची चौकशी केली. या चौकशीचा अहवाल तहसीलदार यांनी तयार करुन जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया यांना २७  एप्रिलला सादर केला. या अहवालात दुकानदाराने लाभार्थ्यांची लुबाडणूक केली आहे, यात प्रत्यक्ष आवक व आॅनलाईन विक्री यात तफावत आहे, वाटपाचा वेळ दर्शविणारा फलक नाही, दैनिक साठा फलक नाही, लाभार्थ्यांची यादी फलक नाही, विक्री रजिस्टर व आॅनलाईन विक्री यामध्ये तफावत आहे, पावती देत नसल्याचे आढळून आले, शिधापत्रिका धारकांना कमी धान्य वाटप केल्याचे आढळून आले. असे मुद्दे नमुद केलेले आहेत. पण जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या दुकानदारावर अजून पर्यंत कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आता आम्हाला कुठलीच तडजोड नको या धान्य दुकानदारांचा परवाना रद्द करा असा पवित्रा गावकर्यानी घेतला आहे.
आता या शिधापत्रिका धारकांनी मेघनाथ बहेकर याचेकडून धान्य घेण्यास नकार दिला. या संदर्भात वरिष्ठांनी चौकशी करून न्याय द्यावा व परवाना रद्द करावा. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकार्याकडे करण्यात आली असल्याचे पत्रपरिषदेत शिधापत्रिका धारक  श्यामराव जयराम मेश्राम, नथुजी जगन रहांगडाले, राधेलाल गोपीचंद पटले, गुणेश्वर भैय्यालाल हरिनखेडे व इतर लाभार्थ्यांनी सांगितले.