रेती अभावी विकास कामे खोळंबली, घरकुल योजनेवर परिणाम

268
प्रशासनाने पावले उचलण्याची गरज
संतोष रोकडे
विदर्भ वतन / अर्जुनी-मोर : तालुक्यातील रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने चोरट्या पध्दतीने प्रत्येक गावात रेती आणली जात आहे. रेती चोरीचा दंड आकारणीचे शुल्क अमाप आहे त्यामुळे रेतीतस्करांनी आणलेल्या चोरीच्या रेतीचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. विशेष म्हणजे चोरीची रेती ही नित्कृष्ट दर्जाची असून अनेक शासकीय कामांवर या रेतीचा वापर केला जात आहे. मात्र घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची या चढ्या दरात असलेल्या रेतीची खरेदी करण्यात दमछाक होत आहे.
दरवर्षी साधारणत: एप्रिल महिन्यात रेती घाटांचे लिलाव होतात लॉकडाऊनमुळे यावर्षी अजूनपर्यंत लिलाव झालेला नाही. रेती अभावी अनेकांची बांधकामे रखडली आहेत शासनाने घरकुलासाठी प्रत्येक घरकुल मागे पाच ब्रॉस रेती देऊ केली. हे अंतर सुध्दा काही घरकुल धारकांना लांब पडत असल्याने वाहतूक खर्च वाढतो अशी व्यथा त्यांनी मांडली. वर्षाच्या अखेरपर्यंत बरीचशी विकास कामे होतात मात्र, यावर्षी कोरोना वायरसचा प्रादुर्भाव असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तिसर्या लॉकडाऊनमध्ये थोडी सवलत दिल्याने आता बांधकाम सुरु करण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. मात्र रेती आणावी कुठून? हा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राप्त माहितीनुसार यासंदर्भात अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी शुक्रवारी गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली. त्यामुळे लवकरच रेती प्रश्नावर तोडगा निघेल अशी आशा निर्माण झालेली आहे.