
संतोष रोकडे
विदर्भ वतन / अर्जुनी-मोर : लॉकडाऊनचा फायदा घेत अनेक दुकानदारांनी मिळेल त्या वस्तूचा कृत्रीम तुटवडा निर्माण करून प्रमणापेक्षा जास्त पैसे घेण्याचा सपाटाला लावल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. अशा संधीसाधू दुकानदारांवर मिळालेल्या तक्रारीच्या आधारे शासनाने दंडात्मक कारवाई सुध्दा केली आहे. असाच जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार अर्जुनी-मोर तालुक्यातील नवेगाव बांध येथील रोहीत येरणे या इसमाने आपल्या किराणा दुकानात सुरू केला होता. या इसमाने मीठ सुध्दा सोडले नाही. चक्क मिठाच्या पॉकेटवर मुद्रीत किमतीपेक्षा पाच रूपये जास्त घेण्याचा सपाटा त्याने लावला होता, असा काळाबाजार करताना तो रंगेहात सापडला. या प्रकारावर नायब तहसीलदार गेडाम, निरीक्षक अधिकारी विनोद काळे यांनी त्याचेवर तत्काळ एक हजार रूपयाचा दंड आकारला. परत असा प्रकार घडल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाईची सूचना देऊन काळा बाजार करू नका अशी ताकीद दिली. शिवाय अशा प्रकारचा कुठे काळाबाजार आढळल्यास ग्राहकांनी राजस्व विभागाला त्वरीत माहिती द्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व तहसीलदार विनोद मेश्राम यांनी केले.

