Home गोंदिया उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सवलत मिळालीच नाही

उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सवलत मिळालीच नाही

108 views
0
अनेक लाभार्थी शासनाच्या निधी पासून वंचित
संतोष रोकडे
विदर्भ वतन /अर्जुनी-मोर :  धुळमुक्त स्वयंपाक करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात मोठा गाजावाजा करून ‘उज्वला गॅस योजना’ सुरू केली.  या योजनेंतर्गत गरीब लाभार्थ्यांना गॅस जोडणीही दिली. लॉकडाऊन काळात लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्याकरिता मोफत गॅस देण्यात येईल असे जाहिर करण्यात आले. मात्र, अजुनपर्यंत मोफत गॅस मिळाली नसल्याने लाभार्थ्यी प्रतिक्षेत आहेत.
प्रत्येक महिन्यात जमा झालेली रक्कम उचल करून गॅस हंडा घ्यायचा यामध्ये शासनाने अट घातली आहे की, पहिल्या महिन्याची किस्त जमा झालेली रक्कम उचल करून गॅस हंडा भरल्यावरच दुसर्या महिन्याची सवलत लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होईल. त्यानंतर दुसर्या महिन्याची रक्कम जमा होईल तेव्हा पैशाची उचल करून गॅस हंडा उचल केल्यानंतरच सहा महिन्याची किस्त जमा होईल.
या योजनेचा लाभ घेताना पहिल्या महिन्याची जमा झालेली रक्कम उचल करून गॅस हंडा उचल करणे गरजेचे आहे. मात्र, अर्जुनी-मोर तालुक्यातील उज्वला योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या अनेक लाभार्थ्यांना अजूनपर्यंत एप्रिल महिन्याची  सवलत मिळाली नसल्याने शासनाची ही योजना फसवी तर नाही ना? अशी शंका  लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. अनेकदा लाभार्थी गॅस पुरवणार्या कार्यालयामध्ये जाऊन विचारपूस करतात. आज होईल-उद्या होईल अशी उत्तरे ऐकून लाभार्थी गेल्या पावली परत येत आहेत, त्यामुळे ही योजना फसवी असल्याचे निदर्शनास येते.
याविषयी उज्वला योजनेच्या लाभार्थी आशा जगदीश रोकडे यांनी विदर्भ वतनच्या प्रतिनिधीला माहिती देताना सांगितले की, आम्हाला शासनाच्या उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे. शासनाने कोरोना वायरस काळात तीन महिन्यांकरिता दिलेली सवलत मिळाली नाही. आमच्या खात्यात अजूनपर्यंत एकाही महिन्याची रक्कम जमा झालेली नाही. अनेकदा गॅस जोडणी करणार्या कार्यालयामध्ये जाऊन चौकशी केली मात्र, अजूनपर्यंत खात्यात पैसे जमा झालेले नाही.