कॉटन मार्केट होणार उद्यापासून सुरू

280

विदर्भ वतन / नागपूर : कॉटन मार्केटमधील गर्दी लक्षात घेता गत काही दिवसांपासून बंद करण्यात आलेला कॉटन मार्केट उद्या दिनांक १९ पासून सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. या आदेशानुसार पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत येथील भाजीपाल्याची दुकाने सुरू राहतील. मात्र, किरकोळ विक्रीसाठी परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सामान्य विक्रेत्यांकडूनच नागरिकांना भाजी खरेदी करता येणार आहे. नागपूर बाहेरून येणार्या भाजीच्या वाहनांना रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेतच कॉटन मार्केट परिसरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. या मार्केटमधील वेगवेगळ्या सेक्टरमधील दुकानदाराला आठवड्यातून एकच दिवस दुकान उघडून व्यवसाय करता येईल अशी सूचना देण्यात आली आहे. भाजीपाला वगळता या मार्केटमधील इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र, दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहील.