Home नागपूर शहरात सहाव्या कोरोनाबाधीताचा मृत्यू

शहरात सहाव्या कोरोनाबाधीताचा मृत्यू

187 views
0
नागपुरात रूग्णसंख्या ३६५ 
विदर्भ वतन / नागपूर : रविवारी शहरात २३ नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली असून आता शहरात हा आकडा ३६४ वर पोहचला आहे. तर मृताची संख्या सहा झाली आहे. २८ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. बरे होऊन घरी परतणार्याची संख्या आता २२७ एवढी झाली आहे.
दोन महिन्यापूर्वी शहरात कोरोनाचा संसर्ग झाला होता यावर शासनातर्फे पावले उचलण्यात आली तरी या कालावधीत मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा येथील साखळी तुटली नाही उलट दररोज अन्य परिसरातुन नवे रूग्ण दाखल होत आहेत. त्यातच सारीने मृत्यू झालेले रूग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने प्रशासनापुढे ही फार चिंतेची बाब ठरत आहे.
४ एप्रिल रोजी शहरात पहिला कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला होता. सतरंजीपुरा येथील ६८ वर्षीय या रूग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. २१ एप्रिलला मोमीनपुरा येथील ७० वर्षीय रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २८ एप्रिल रोजी पार्वतीनगर येथील एका २२ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. नंतर ११ मे रोजी पांढराबोडी येथील २९ वर्षाच्या रूग्णाचा उपचार सुरू असताना सारीने मृत्यू झाला त्याचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला होता. १६ मे रोजी सारी व कोविड पॉझिटिव्ह असलेल्या गड्डीगोदाम खलाशी नगर येथील ६५ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाला. लगेच दुसर्या दिवशी शांतिनगर येथील ५८ वर्षीय पुरूषाच्या मृत्यूचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. या आठ दिवसातच तीघांच्या मृत्यूची नोंद झाली. शांतिनगर येथील रूग्णाचा शनिवारी मृत्यू झाल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
विदर्भात ७० रूग्णांची भर, दोघांचा मृत्यू
विदर्भात लॉकडाऊन शिथील केले जात असताना रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. रविवारी ७० रूग्णांची नोंद करण्यात आली. यात ३७ रूग्ण एकट्या अकोल्यातील आहेत. आता विदर्भातील एकूण रूग्णसंख्या ८४७ झाली आहे. अकोल्याची रूग्णसंख्या २५७ झाली आहे. यात एक ४८ वर्षीय रूग्णांचा मृत्यू झाला. या जिल्ह्यात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला. येथील एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली. नागपुरात शनिवारी ५६ वर्षीय व्यक्तीचा घरीच मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचा नमुना पॉझिटिव्ह आला.
राज्यात एकाच दिवशी २३४७ बाधितांची नोंद
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून रविवारी २ हजार ३४७ रूग्णांची भर पडली. यासोबत राज्यातील एकूण बाधित संख्या ३३ हजार ५३ इतकी झाली आहे. दिवसभरात ६३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात मुंबईत ३८, पुणे ९, औरंगाबाद ६, सोलापूर ३, रायगड ३, ठाणे, पनवेल, लातूर, अमरावती येथील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. तर देशात ४ हजार ९८७ नव्या रूग्णांची नोंद झाली.