अर्जुनी-मोर तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार

238
प्रशासन सुस्त, व्यापारी मस्त, गोरगरीब झाले कंगाल
संतोष रोकडे
विदर्भ वतन /अर्जुनी-मोर : जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासवून व्यापारी काळाबाजार करीत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. याचा सर्वसामान्य व  गोरगरीब जनतेला प्रचंड फटका बसत आहे. प्रशासन मात्र कागदोपत्री सगळे काही व्यवस्थीत असल्याचे दर्शवून गरीब जनतेला दिलासा देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे हा प्रकार बघून प्रशासन सुस्त व्यापारी मस्त तर गोरगरीब जनता कंगाल होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
कोरोणाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी केली जात आहे लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासेल व वस्तू महाग होतील असे अंदाज वर्तविली जातात. त्या वस्तूंच्या खरेदीसाठी लोक दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. नेमका याचाच लाभ व्यापार्यांकडून घेतला जातो, व्यापारी या वस्तूंचा काळाबाजार करून दुप्पटीपेक्षा अधिक दराने त्या वस्तूंची विक्री करतात बुधवार व गुरुवारी मिठासाठी लोकांनी दुकानात रांगा लावल्या असल्याचा प्रकार निदर्शनास आला. अर्जुनी-मोर तालुक्यातील अर्जुनी मोहन शहरासह ग्रामीण भागात हा प्रकार सर्रास सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी सुपारी विषयी सुद्धा असे घडले होते. ३५० रुपये प्रतिकिलो असलेली सुपारी चक्क आठशे रुपये किलो दराने विकल्या गेली. तसेच मीठसुद्धा चढ्या भावाने विकल्या जात आहे. प्रशासनाने शहानिशा केल्यास काळाबाजार करणार्या या व्यापार्यांचे मोठे घबाड उजेडात येऊ शकते. शहरासह ग्रामीण भागातील दुकानात दरपत्रक लावलेले नाही, त्यामुळे व्यापारी आपल्या मर्जीने वस्तू विकत आहेत प्रशासन मात्र कागदोपत्री घोडे रंगवण्यात व्यस्त आहे. साठेबाजी करू नका व वाढीव दराने वस्तू विकू नका अन्यथा कार्यवाही करू, असा इशारा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी दिला.