
राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ वतन /गोंदिया : कोरोनावर मात करण्यासाठी देशात युध्द पातळीवर संघर्ष सुरू आहे. या महायुद्धात वैद्यकीय कर्मचारी लढा देत आहेत. त्यासोबतच पोलीस कर्मचारी सुध्दा दिवस रात्र पहारा देत आहेत. परंतू कर्तव्यावर असतांना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका महाराष्ट्र राज्याच्या टोकावर असून तालुक्यापासून अवघ्या काही अंतरावर मध्यप्रदेशची सीमा आहे. ही सीमा ओलांडून अनेक लोक तालुक्यात येत असतात. २२ मार्च पासून अवघे देश बंद झाल्यापासून या सीमेवर डॉक्टर व पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांना जोडणार्या सीमेवर वाघ नदी आहे. पूल ओलांडून नागरीक ये-जा करतात. याच सीमेवर कर्तव्य बजावणारे डॉक्टर व पोलीस कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत.
मध्यप्रदेशातील मजूर हैदराबाद वरून पायी चालत येत असून ते याच सीमेवरून मध्यप्रदेशत आपल्या गावी परत जात आहेत. या मजुरांची सीमेवर डॉक्टर प्राथमिक तपासणी करून त्यांची नोंद करून घेतात व नंतर त्यांना ही सीमा ओलांडून जाऊ देतात. रात्रंदिवस जागून डॉक्टरांना यांची नोंद घ्यावी लागते. सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत व रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत अशी १२-१२ तास दोन डॉक्टरांना आपली जबाबदारी पार पाडावी लागत आहे. परंतु या सीमेवर डॉक्टरांनसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसून फक्त खुर्चीवर बसून कर्तव्य बजावे लागत आहे. रात्री अपरात्री त्याना शौचालयास जायचे असल्यास अंधारात नदीकाठी किंवा शेतात जावे लागत आहे. भर उन्हात डॉक्टरांना एका ठिकाणी बसून तर पोलिसांना २४ तास उभं राहून कर्तव्य पार पाडवी लागत आहे.
प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसून जेवणापासून तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वत:लाच करावी लागत आहे. एका झोपडीत सामान ठेवून कर्तव्यदक्ष राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी येणार्या मजुरांची संख्या वाढली असून बाहेरून परत येणार्या मजुरांची नोंद दिवसरात्र करावी लागते. डॉक्टरांनी सांगितले की, मध्यप्रदेशातील लांजी तालुक्यात वैद्यकीय सेवा कमी असल्यामुळे रात्रीला आपत्कालीन सेवेकरिता रुग्ण गोंदिया व आमगावला येतात. त्यांची माहिती घेऊन आकस्मीक रुग्णांना प्रवेश दिला जातो. उर्वरितांचा प्रवेश नाकारला जातो.
अशाप्रकारे डॉक्टरांना व पोलिसांना पहारा देत कर्तव्य पूर्ण करावे लागते आहे. परंतु कर्तव्यासमोर त्यांच्या वक्तीगत समस्या गौण झालेल्या आहेत.

