लग्न लावुन वधूला दुकाचाकीवरून नेले 

230
विदर्भ वतन / गोंदिया :  सकाळी ११ वाजताची वेळ, वर आपल्या वडिलांसोबत दुचाकीवर स्वार होऊन वधू मंडपी आला आणि लॉकडाउनचे सर्व नियमांचे तंतोतंत पालन करीत रितिरिवाजनुसार विवाहबद्ध होऊन वधूला घेऊन गेला.
 गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसोडी रयत येथील तुलाराम भेंडारकर यांच्या मुलीचे लग्न सडक अर्जुनी तालुक्यातील राका येथील रवींद्र फुंडे यांच्या मुलाशी जुळले. लग्नाची तारीख ५ मे निश्चित झाली. दोन्ही पक्षाकडील मंडळींनी लग्न सोहळा धुमधडाक्यात आटोपायचे यासाठी बँड, डेकोरेशन, आचारीसह इतर साहित्यांसाठी अ‍ॅडव्हॉन्स देऊन जुळवाजुळव करण्यात आली. परंतु अशातच कोरोनाने एन्ट्री मारली. या महामारीची भयावहता पाहून शासनाने देशभर लॉकडाउन केले. मग लग्न करायचे कसे? ही चिंता दोन्ही पक्षाला पडली. यासाठी तालुका प्रशासनाचे मार्गदर्शन घेण्यात आले. प्रशासनाने वराकडील ५ व वधुकडील २० एवढीच मंडळी उपस्थित ठेवावी  अशी परवानगी दिली. त्यानुसार नियोजन करण्यात आले. वर आपल्या वडिलांना घेऊन लग्नासाठी वधुमंडपी आला आणि रितिरिवाजनुसार लग्न लावून वधूला घेऊन गेला.
याचप्रमाणे त्याच दिवशी संध्याकाळी वराच्या बहीणीचे लग्न भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सोनपुरी येथील जगन कठाणे यांच्या मुलाशी राका येथे पार पडले. दोन्ही लग्न सोशल डिस्टसिंग व शासन नियमांचे पालन करीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित पार पडले. राका येथील रवींद्र फुंडे यांचा लहान मुलगा मुंबईला रोजगारासाठी गेला आणि लॉकडाउनमुळे तिथेच अडकला. त्यामुळे त्याने आपल्या भावा-बहिणीचे लग्न व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून विडिओ कॉलद्वारे पार पाडले.
या आदर्श विवाहाची सर्वत्र चर्चा असून सर्वांचे कौतुक केले जात आहे