पीएम केअर फंडमध्ये किती रक्कम जमा झाली? माहिती द्या

258

उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
विदर्भ वतन / नागपूर : पीएम केअर फंडमध्ये आतापर्यंत जमा झालेल्या रकमेची माहिती जाहीर करण्यात यावी यासाठी अ‍ॅड. अरविंद वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. कोरोना संक्रमणाविरूध्द लढण्यासाठी आणि प्रभावित नागरिकांना आवश्यक सहकार्य करण्यासाठी या फंडाची गेल्या २८ मार्च रोजी स्थापना करण्यात आली. या फंडमध्ये देश-विदेशातील सामान्य व्यक्तींपासून ते मोठमोठ्या उद्योजकांपर्यंत अनेकांनी दान दिले आहे. या फंडात टाटा समूहाने १५०० कोटी रूपये तर, अजीज प्रेमजी फाऊंडेशनने १२२५ कोटी रूपये दान केले आहेत. याशिवाय जागतिक आरोग्य संघटना, एशियन डेव्हलपमेंट बँक आदींनीही कोट्यवधी रूपये दिले आहेत. परंतु, फंडमध्ये आतापर्यंत किती रक्कम जमा झाली याची माहिती सरकाने जाहीर केली नाही. त्यामुळे यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्याची गरज आहे. तसेच, फंडमधील जमाखर्चाचे कॅगमार्फत आॅडिट केले गेले पाहिजे. तसे न केल्यास या घटनात्मक यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते पंतप्रधान हे या फंडचे अध्यक्ष तर, केंद्रीय संरक्षण मंत्री, गृहमंत्री व वित्तमंत्री विश्वस्त आहेत. याशिवाय ट्रस्टच्या घटनेनुसार, तीन विश्वस्त आरोग्य, विज्ञान, विधी, कॉर्पोरेट इत्यादी प्रमुख क्षेत्रांमधून अनुभव व पात्रता निकषांच्या पूर्ततेनंतर भरायचे होते. परंतु, एक महिन्यावर कालावधी संपूनही या नियुक्त्या झाल्या नाहीत. तीनपैकी दोन विश्वस्त देशातील प्रमुख विरोधी पक्षांमधून नियुक्त करावेत असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.