
नाभिक एकता मंचचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गजानन बोरकर
विदर्भ वतन / कामठी : देशव्यापी लॉकडाऊनमध्ये अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. नाभिक समाजावर याचा मोठा परिणाम झाला आहे. आता सरकारने लॉकडाऊन-थ्री मध्ये अनेक दुकाने सुरू करण्यास परवाणगी दिली आहे. मात्र, त्यात सलून व नाभिक बांधवांद्वारे चालविण्यात येणार्या पारंपरिक व्यवसायाचा समावेश नाही. यामुळे नाभिकांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. अशा कठिण समयी नाभिकांना मदत करण्याचे आवाहन नाभिक बांधवांनी केली आहे.
यासंदर्भात कामठी तालुक्यतील नाभिक एकता मंचचे अध्यक्ष सुरेश बोपुलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाभिकांच्या समस्येबाबत तहसीलदार अरविंद हिंगे यांना निवेदन दिले. नाभिक समाज हा नित्य मानव शरीर सेवाचा इतिहास काळावपासून प्रतिक असून तो मानवाला सुंदर कसे करावे आणि त्याची केशरचनेपासून ते शारीरिक स्वच्छतेपर्यंत सर्व कामे करण्याची सेवा देतो. परंतू आजपर्यंत शासनाचे नाभिक समाजावर दुर्लक्ष राहिले आहे, असे नमूद करून प्रमुख तीन मागण्या केल्या आहेत.
बोपूलकर यांनी केलेल्या मागण्यांमध्ये नाभिक कारागिरांना तीन महिन्याकरिता ५ हजार प्रतिमाह अनुदान देण्यात यावे, दुकान भाड्याकरिता एकरकमी २५ हजारांचे अनुदान देण्यात यावे, दुकान व घराचे तीन महिन्याचे वीज बील माफ करावे अशा मागण्या केल्या आहे. निवेदन तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. राज्यात ५ लाख सलून दुकाने असून सुमारे २१ लाख कारागीर दुकाने बंद करून बसले आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात अनेकांचे या धंद्यावरच पोट आहे. रोजच्या मजुरीवर पोट भरणार्या नाभिकाला आता तर उधारीवर धान्य देखील मिळणे बंद झाले आहे.
शासनाने मदत केल्यास उदरनिर्वाहासाठी मोठा हातभार लागेल, असेही मत नाभिक एकता मंच दुकानदार संघ कामठी तालुका अध्यक्ष सुरेश बोपुलकर, सचिव सचिन अमृतकर, केंद्रीय उपाध्यक्ष मनोज धानोरकर, केंद्रीय संघटन सचिव रविंद्र पारधी, विनोद वाट, सुनील धांडेकर, देवेंद्र फुलबांधे, दिलीप खुरगे, अजय श्रीवास, आशिष श्रीवास, विशाल चंन्ने, सुदाम चौधरी, संतोष खुरगे, लक्ष्मण अमृतकर, अमोल उके, अशोक ढोके, संजय सूर्यवंशी, गजानन फुलबांदे, प्रदिप साखरकर यांनी व्यक्त केले.

