बंदुकीच्या धाकावर लुटणार्यांच्या आवळल्या मुसक्या

172
पोलिसांवरच ताणला देशी कट्टा, ८० ग्राम सोने जप्त    
राधाकिसन चुटे
विदर्भ वतन /गोंदिया : तीन महिन्यापुर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात आमगाव पोलिसांना यश आले. अटकेतील आरोपींकडून ८० ग्राम सोने जप्त करण्यात आले. मोहम्मद अख्तर इकबाल मोगल, रा. बनगाव आणि विनम्र उर्फ नितेश जगदीश भडके अशी आरोपींची नावे आहेत.
आमगाव पोलिस स्टेशन अंतर्गत व्दारकाधाम बनगाव येथील भवन गिरी यांच्या घरी २ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० च्या सुमारास या आरोपींनी बंदुक व चाकूचा धाक दाखवून २ लाख ४७ हजार रूपयाचा मुद्देमाल लुटला. या धाडसी चोरीची गिरी यांनी आमगाव पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवून मोहम्मद अख्तर इकबाल मोगल याला ६ मे रोजी ताब्यात घेतले इकबालने विनम्र भडके याचा देखील यात सहभाग असल्याचे सांगीतले. भडके हा देवरी येथील पंचशील चौकात राहात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या दिशेने धाव घेतली. मात्र, भडके याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर देशी कट्टा ताणून धरला यावर पोलिसांनी आपले कसब दाखवून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याचे जवळ दोन जिवंत काडतुसे आढळली आणि चोरीचे ८० ग्राम सोन्याचे दागिने देखील मिळाले.
आरोपींवर भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, २७ आणि भादंविसच्या १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शामराव काळे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष जाधव, पोलिस हवालदार रामेश्वर बर्वे, आनंद भांडारकर, युवराज सव्वालाखे, खुशाल पेंदाम, अरुण उके, अन्सार कुरेशी सुरेंद्र लांजेवार व सायबर सेलचे दीक्षित दमाहे यांनी केले.