कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे पुढाकार घ्यावा 

319
आढावा बैठकीत आमदार कोरोटे यांचे आवाहन
राधाकिसन चुटे
विदर्भ वतन /गोंदिया: देवरी शहर हे राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे. त्यामुळे या शहरातून येण्याजाण्यार्यांचे आवागमन मोठ्या प्रमाणावर होत असते. दरम्यान, शासन आणि प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमध्ये नुकतीच सवलत दिली. असे असताना नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी, कोविड-१९ चा प्रसार देवरी परिसरात वाढण्याची भीती प्रशासनाने  व्यक्त केली आहे. या रोगापासून आपला परिसर आणि आपल्या आप्तस्वकीयांना सुरक्षित ठेवायचे असेल तर नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे पुढाकार घेवून अनावश्यक गर्दी आणि वर्दळ कमी करावी असे आवाहन देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी केले.
  ते आज देवरी येथे नगरपंचायत सभागृहात आयोजित अधिकार्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी देवरीच्या नगराध्यक्ष कौशल कुंभरे, उपाध्यक्ष अलताब शेख, तहसीलदार विजय बोरूडे, मुख्याधिकारी अजय पाटणकर, गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे, ठाणेदार अजित कदम आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अधिकार्यांनी आमदारांना देवरी शहर आणि तालुक्यातील कोविड-१९ च्या स्थितीबद्दल माहिती दिली.  देवरी शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने येथून आवागमन जास्त आहे. त्यामुळे आपल्या भागात कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय देवरी शहरात टाळेबंदी दरम्यान नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी बर्याच प्रमाणात सवलती दिल्या गेल्या. परंतु, दुदैर्वाने व्यापार्यांसह नागरिकही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करताना दिसत नाही. अनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सुद्धा नागरिक बाहेर पडत असून ‘सोशल डिस्टंसींगचे’ पालन करत नाही. जर परिस्थिती अशीच राहिली तर आपला भाग ग्रीन झोन मधून कधीही रेडझोनमध्ये जाऊ शकतो, अशी माहिती अधिकार्यांनी आमदारांच्या निदर्शनात आणून देत आणखी काही काळ कडक निर्बंध लावण्याच्या सूचना देखील अधिकार्यांनी केल्या.
आपल्या देवरी परिसराला आणि पर्यायाने आपल्या आप्तस्वकीयांना कोविडच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तपणे पुढाकार घ्यावा. शासन प्रशासन सक्ती करेल, अशी वेळ येऊ देऊ नका, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, अत्यावश्यक नसलेली प्रतिष्ठाने-दुकाने व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवून कोरोना आपल्या भागात शिरकाव करणार नाही, याची खबरदारी घेऊन सहकार्य करावे असे आवाहन या बैठकितनंतर आमदार कोरोटे यांनी जनतेला केले.