गोंदियात ४५ दिवसानंतर उघडली दारु दुकाने, तळीरामांची गर्दी

181
राधाकिसन चुटे
विदर्भ वतन न्युज पोर्टल/गोंदिया: केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत. केंद्राच्या निर्देशाप्रमाणे ग्रीन झोन असलेल्या गोंदियात आजपासून दारू विक्री सुरु करण्यात आली.  ४५ दिवसानंतर तळीरामांना आज दारू मिळत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. दारू दुकान उघडणार म्हणून तळीरामांनी अक्षरश: सकाळपासूनच दुकानासमोर रांगा लावल्या होत्या. विशेष म्हणजे दारुखरेदीसाठी गर्दी मोठी असली तरी कुठेकुठे फिजिकल डिस्टंस लोक पाळत असल्याचे तर काही ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचेही बघावयास मिळाले.
गोंदिया जिल्ह्यात मागील २८ दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याने, जिल्हाधिकार्यांनी आजपासून दारू विक्रीला परवानगी दिली. ग्रीन झोन असलेल्या गोंदियात आजपासून मद्य विक्री सुरु करण्यात आली आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ही दारू दुकाने सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करत दुकानदारांनी दुकानांसमोर बॅरिकेट लावले तसेच दुकानात आलेल्या प्रत्येक ग्राहकाला हात धुणे अनिवार्य करण्यात आले. त्यासोबत प्रत्येक ग्राहकाची थर्मल टेस्टींग देखील करण्यात येत आहे. पोलिसांचा बंदोबस्त सुध्दा वाईनशॉप समोर लावण्यात आलेला आहे.
जिल्हाधिकार्यांचा नोंदवला निषेध
गोंदिया जिल्हाधिकारी डॉ. कादबंरी बलकवडे यांनी बुद्ध जयंतीच्या पर्वावर मद्य विक्रीची परवानगी देऊन परंपरेला गालबोट लावले तसेच बुध्दजयंतीच्या दिवशी दारु दुकान सुरु करण्याकरीता घेतलेला निर्णय हा सामाजिक भावनेला ठेच पोचविणारा असल्याची टिका बहुजन समाज पक्षाचे माजी नगरसेवक सुनिल भरणे यांनी केली तसेच जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला.