अर्जुनी-मोर तालुक्यात खर्रा विक्री जोमात, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

271
संतोष रोकडे
विदर्भ वतन न्युज पोर्टल / अर्जुनी मोर : कोरोनामुळे महाराष्ट्र अतिप्रभावित झाला आहे.  यावर खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र व राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करून कोरोना विषाणूंचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र, काही समाजकंटक स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ विकून कोरोना पसरवित असल्याचे दिसून येते. काही दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात एका खर्रा विक्रेत्याकडून सात लोकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता. पानटपरी चालक हा स्वत:च्या घरी खर्रा बनवून शौकिनांना त्यांच्या घरी नेवून देत होता. हा पानटपरी चालक कोरोना संक्रमीत असल्याने त्याची लागण याच्या ग्राहकांना झाली नेमका असाच प्रकार अर्जुनी-मोर तालुक्यात सुद्धा घडण्याची शक्यता आहे.
अर्जुनी-मोर तालुक्यात प्रत्येक गावात पान टपरी व्यवसाय बंद झाल्याने परिचालक आपल्या स्वत:च्या घरी खर्रा बनवून ग्राहकांच्या घरी पोहोचवित आहेत, तर कधी ग्राहक त्याच्याकडे येऊन खर्रा घेऊन जातात. पानटपर्या बंद परंतु खर्रा विक्री जोमात सुरू, असा प्रकार तालुक्यातील सर्वच गावात निर्धास्तपणे सुरू आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, घरातच राहा, सामाजिक अंतराचे पालन करा असे सांगितले जात असले तरी ग्रामीण भागात सर्रास तंबाखूजन्य पदार्थ विक्री सुरू आहे. पोलीस प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे अशा समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.