नऊ महिन्यांपासून कर्मचार्यांना वेतन नाही 

316
संस्थेला जमीन दान केल्यावरच दिली होती नोकरी 
विदर्भ वतन न्युज पोर्टल / गोंदिया : एका प्रतिष्ठीत कृषी महाविद्यालयातील कर्मचार्यांना तब्बल नऊ महिन्यांपासुन वेतन दिले नसल्याने त्यांचेवर उपासमारिची वेळ आली आहे. या कर्मचार्यांनी उपजावू शेतजमिनी या संस्थेला दान दिल्यानंतर त्यांना येथे नोकरीवर ठेवण्यात आले होते. जमिनीच दान केल्यानंतर संस्थेला वेगळे असे काहीच देण्या-घेण्याचे ठरले नाही. नेमक्या याच आकसापोटी लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत या भाबड्या कर्मचार्यांचे वेतन थांबविण्यात आले. यात संतापजनक बाब अशी की, यातील पाच कर्मचार्यांना नोकरीवरून काढण्यात आले. त्यामुळे इतर कर्मचारी धास्तावलेले आहेत. या सर्वांना संस्थेने नोकरीचे लालच देऊन आपल्या जमिनी हडपल्या आणि काही काळ नोकरीवर ठेवून एका-एकाला काढण्याचा सपाटा लावल्यामुळे प्रत्येक क्षण या कर्मचार्यांचा मानसिक तनावात जात असल्याने त्यांच्या अख्या कुटूंबाला रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यात हिराटोला हे गाव आहे. या गावात कृषी महाविद्यालय सुरू करण्याकरिता बहुजन हिताय या संस्थेच्या माध्यमातुन १६ शेतकर्यांना महाविद्यालयात नोकरी देण्याचे लालच देऊन त्यांच्या उपजावू जमिनी बळकावण्यात आल्या. या अशिक्षित शेतकर्यांनी कायमस्वरूपी नोकरी मिळणार या आशेने आपल्या जमिनी संस्थेच्या नावे लाऊन दिल्या. आणि याच जमिनीवर बहुजन हिताय व्दारा संचालित ‘मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय’ उभे झाले. जमीन दान करणारे हे कर्मचारी २३ आॅगस्ट २००९ पासुन नियमित नोकरीवर आहेत, पण जमिन दान करणार्या कर्मचार्यांना आता उतरती कळा लागली. संस्थेने एका-एकाला वेठिस धरने सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून या कर्मचार्यांना तब्बल नऊ महिन्यांपासुन वेतनच दिले नाही शिवाय पाच कर्मचार्यांना नोकरीवरून सुध्दा काढून टाकण्यात आले. त्यामुळे इतर कर्मचारी धास्तावलेले आहेत. वेतन मिळत नसल्यामुळे आमदार विनोद अग्रवाल यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकार्यांना तक्रारी दिल्या होत्या, या तक्रारीवर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी चौकशीसाठी समिती सुध्दा नेमली. या समितीने या महाविद्यालयात येऊन चौकशी सुध्दा केली पण अहवाल मात्र, गुलदस्त्यातच ठेवण्यात आला असल्यामुळे नेमके पाणी कुठे मुरते हे समजायला जागा नाही. आम्ही दिलेल्या तक्रारी मॅनेज करून शासनकर्त्यांनी आम्हाला वार्यावर सोडले असल्याची खंत या पिडीतांनी व्यक्त केली.
जानेवारी महिन्यापर्यंतचा  पेमेंट बँकेद्वारे दिलेला आहे व सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मार्च एंडिंगचे काम झाले नाही. यामुळे शासनाकडून कॉलेजला जी स्कॉलरशिप मिळते ती मिळाली नसल्यामुळे कर्मचार्याचे पेमेंट दिले नाहीत.  स्कॉलरशिप मिळाल्यावर त्वरित पेमेंट करू.   
 के. के. डोंगरे संस्थापक
 मनोहर्भाई पटेल कृषी महाविद्यालय, हिरोला