Home नागपूर लॉकडाऊनमुळे काळ्या बाजाराला उधान

लॉकडाऊनमुळे काळ्या बाजाराला उधान

163 views
0
विदर्भ वतन न्युज पोर्टल / नागपूर : कोविड-१९, कोरोना या वायरसच्या फैलावाला आळा घालण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून देशभरात लॉकडाऊन सुरू करण्यात आले. लॉकडाऊनला आता एक महिना पुर्ण होत येईल. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत. याचाच फायदा घेत जीवनावश्यक वस्तुच्या दुकानांमधून मिळणार्या काही वस्तुंवर पाच पट पैसे आकारण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित विभागाने यावर अंकुश ठेवला जाईल आणि त्या व्यापार्याला दंड व शिक्षा करण्यात येईल असे जाहिर केले परंतु त्या घोषणेचा कोणताही फायदा होत नसल्याचे दिसून येते. एकंदरीत राजरोसपणे जादा भावात काही ठराविक वस्तुंच्या किमती आकारण्यात येत आहे. लॉकडाऊनपुर्वी रामेश्वरी रोड परिसरातील जय जमुना सुपर बाजारात सोयाबीन तेलाचा टिनाचा डबा १२५० ते १३०० रूपयाला मिळत होता. लॉकडाऊन घोषीत होताच उवघ्या तीन-चारच दिवसात तोच डबा १७०० रूपयाला विकण्याला सुरूवात झाली.
खर्रा आणि नागपुरातील शौकिनांचा रूणानुबंध जुना आहे, शहरात शौकीनांची कमतरता नाही. त्यामुळे खर्र्यासाठी लागणारी सुपारी आणि तंबाखुच्या किमतीदेखील अशा प्रकारे जवळपास पाच पट भावाने विकण्यात येत आहेत. परिणामी पानठेले जरी बंद असले तरी पानठेल्याच्या परिसरात आपल्या ओळखीच्या लोकांना हेच पानठेलेवाले आपल्या फंटरांना पुढे करून डबल भावात खर्रा विकत आहेत. ज्यांना ठवकर तंबाखुचा शौक आहे त्याचा पाच रूपयाला मिळणारा तंबाखु आता मिळालाच तर २५ रूपयाला मिळत असल्याचे सांगण्यात येते. याही पेक्षा एक पाऊल पुढे गेलेच तर दारूची दुकाने देखील बंद असल्याने अवैद्य दारू विक्रीला उधान आले आहे. अगदी मुबलक प्रमाणात गल्लीबोळात मोहफुलाची दारू देशी दारूच्या किमतीत मिळत आहे मग विदेशी दारूचे भाव काय असावे याचा अंदाज घेतलेलाच बरा.
फक्त भाजीपाला आणि प्रिंटेड वस्तु आटोक्यात
लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी देखील करण्यात आली आहे. परिणामी शहरालगतचा भाजीपाला इतर जिल्ह्यात नेता येत नाही त्यामुळे माळवा लावणार्या शेतकर्यांना आपला भाजीपाला आपल्याच शहरात आणावा लागतो. त्यामुळे भाजीपाला मुबलक प्रमाणात मिळत असुन त्याचे भाव देखील आटोक्यात आहेत. तसेच किराणा दुकानात ज्या वस्तुच्या पॅकिंगवर प्रिंटींग आहे अशा वस्तुत काळाबाजार होतांना दिसुन येत नाही. मात्र, खुल्या वस्तुंवरील किमतीचे सर्व अधिकार दुकानदाराच्या हातात आहे. शिवाय सर्वत्र बंदी असल्यामुळे कोणी तक्रार करायला धजावत नाही यामुळेच या व्यावसायीकांची फावते आहे.