देणार्यांचे हात सरसावले, गरजवंत मिळेना !

265
विदर्भ वितन न्यूज पोर्टल / नागपूर : लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे. मुख्यत्वे रोजंदारीने काम मिळवून जगणार्या वर्गाची मोठी दुर्दशा होईल किंवा त्यांचेवर उपासमारीची वेळ येईल असे सर्वांना वाटत होते पण शासनाने ज्यांचे जवळ रॅशन कार्ड आहे आणि ज्यांचे जवळ नाही अशा सर्वांना कोणत्या ना कोणत्या आधारावर धान्य वाटप केले आहे. शासन इथवरच थांबले नाही तर रॅशन दुकानात काळाबाजार होऊ नये म्हणून प्रत्येक रॅशन दुकानात एक शासकिय अधिकरी नियुक्त केला आहे. यामुळे धान्याचा काळाबाजार करणार्यांना किंवा संधीसाधूंना चाप बसला. अशा वेळी सामाजिक संस्थांनी आपली बांधिलकी जपत जागोजागी भोजनदान सुरू केले आहे. दररोज नित्यनेमाने सकाळ-संध्याकाळी हे भोजनदान सुरू असते. मात्र या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांकडे बघितल्यास एकही व्यक्ती हा खरोखरच गरजू आहे असे दिसून येत नाही.
असाच एक प्रकार नित्यनेमाने रामेश्वरी रोड, मानवता शाळेपुढील एक कॅम्प्युटर इंस्टीट्यूटपुढे सुरू आहे. येथे दररोज सकाळ-संध्याकाळ प्रामाणीकपणे भोजनदान दिले जाते. मात्र, या परिसरात बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाच या भोजनदानाची आवश्यकता आहे. बाकी सर्व संपन्न लोक येथे येऊन रांगेत उभे असल्याचे दिसून येते. तर कुंजीलाल पेठेतील रूपनगरात देखील कालपासून अशाच प्रकारे एका प्रामाणीक नगरसेविकेने भोजनदान देण्यास सुरूवात केली आहे. त्यांचा हेतू जरी प्रामाणीक असला तरी या परिसरात शोधून एकही घर गरजू असल्याचे दिसून येत नाही अगदी सर्वांच्या दुमजली बिल्डींगा उभ्या आहेत. तरी येथे लोक रस्त्यावर आल्यासारखे तुटून पडत आहेत. हा प्रकार म्हणजे खर्या गरजवंताच्या तोंडचा घास हिरावणारा असल्याच्या चर्चेला या परिसरात पेव फुटले आहे. समाजात काही लोक असेही असतात ज्यांचे पोट असे उपक्रम राबविणार्या दात्यांच्या दातृत्वावर असते, येथेही एकाचे चांगलेच फावले. असो
शहरात दानदात्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किट देखील वाटणे सुरू केले आहे. या किट देखील संपन्न लोकांनी हडपल्या आहेत. आजही अशांच्या घरची झाडाझडती घेतली तर बरेच घबाड नजरेस येवू शकते.