Home Breaking News राज्यात उद्योजक-कारखानदार ‘‌वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

राज्यात उद्योजक-कारखानदार ‘‌वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

324 views
0

मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील दहा महापालिका क्षेत्र वगळून कोरोना प्रादुर्भाव कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्योग सुरू करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले असले तरीही उद्योग, कारखाने सुरू करण्यासाठी असलेल्या अटींमुळे उद्योजक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. औरंगाबाद, नाशिकसह विविध जिल्ह्यांमध्ये कृषिपूरक, औषधनिर्मिती, आयटी, वीटभट्ट्या अादी उद्योग सुरू करण्याविषयक परवानगी देण्यात अाली आहे. मात्र, कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळणे, कामगारांची कारखान्याच्या आवारातच जेवणाची व निवासाची व्यवस्था आदी अटींमुळे संभ्रमाचे वातावरण अाहे.

औरंगाबाद शहराबाहेरील वाळूज, शेंद्रा येथील कारखाने सुरू करण्याची मुभा असली तरीही कामगारांविषयक अटींमुळे कारखाने सुरू करण्यास अडचण असल्याचे उद्योजकांनी सरकारला कळवले आहे. तीच परिस्थिती नाशिकमध्येही असून नाशिक शहरातील सातपूर, अंबडमधील केवळ अत्यावश्यक सेवेशी निगडित अाणि ग्रामीण भागातील केवळ दहा टक्के कारखानेच सुरू हाेऊ शकतील असे चित्र अाहे. सोलापुरात वस्त्रोद्योग आणि विडी उद्योगसंबंधित कारखाने शहराच्या हद्दीतच असल्याने हे कारखाने सुरू होऊ शकणार नाहीत, असे उद्योजकांनी स्पष्ट केले आहे. रविवारी मंत्रालय ते एमअायडीसीचे प्रादेशिक कार्यालये यांमध्ये व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगद्वारे माहितीची देवाण-घेवाण सुरू हाेती. यानुसार अाता उद्याेग सुरू करायचे असल्यास २० एप्रिलपासून एमअायडीसीच्या संकेतस्थळावर एक प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार अाहे.