विविध धर्माचे सण, उत्सव व जयंतीचे कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात साजरे करु नका-डॉ.कादंबरी बलकवडे

250

राधाकिसन चुटे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया:- संपूर्ण जग कोरोना विषाणूचा सामना करीत आहे. आपल्या देशात आणि राज्यात देखील कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. अनेक लोक या विषाणूने बाधित होत असून काहींचा मृत्यू होऊन हे सत्र सुरूच आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक असून कोणीही घराबाहेर पडू नये.एप्रिल आणि मे महिन्यात येणारे विविध धर्माचे सण, उत्सव आणि जयंतीचे कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात साजरे करू नका. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले. गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील विविध धर्माच्या धर्मगुरूंची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी त्या सभेत डॉ. बलकवडे बोलत होत्या.पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे,प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे,उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड व जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बलकवडे पुढे म्हणाल्या, हा एप्रिल महिना आणि पुढील मे महिना कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. या महिन्यात बाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहे.हे प्रमाण कमी करायचे असेल तर गर्दी टाळणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये म्हणजे कोरोना विषाणूची साखळी आपल्याला खंडित करता येईल.या एप्रिल महिन्यात व पुढील मे महिन्यात विविध धर्माचे सण,उत्सव आणि जयंतीचे कार्यक्रम आहेत ते सार्वजनिक स्वरूपात साजरे न करता कौटुंबिक स्वरूपात सामाजिक अंतर राखून साजरे करावे असे धर्मगुरूंनी समाजबांधवांना आवाहन करून कौटुंबिक स्वरूपात हे साजरे करण्याबाबत कळवावे. धार्मिकस्थळी पूजाअर्चा करण्याचे काम केवळ धर्मगुरूंनी करावे. त्या कार्यक्रमात समाजबांधवांनी सहभागी होऊ नये असे डॉ. बलकवडे यावेळी म्हणाल्या. तसेच पोलीस अधीक्षक श्री शिंदे म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदीचा हा काळ असल्यामुळे पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे.मास्कचा वापर सर्वांनी केला पाहिजे. कोणत्याही प्रकारची रॅली काढण्यात येऊ नये तसेच धार्मिक कार्यक्रमाचे सार्वजनिक स्वरूपात आयोजन करण्यात येऊ नये असे ते म्हणाले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्याची ग्वाही उपस्थित सर्व धर्मगुरूंना यावेळी दिली. या सभेला जिल्ह्यातील विविध धर्माचे धर्मगुरू उपस्थित होते.