
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी काही अत्यावश्यक सेवांना सुट देण्यात आली आहे. सर्वत्र रविवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे नोकरदार हा दिवस अवसानाने ‘एंजॉय’ करतात. राष्ट्रीय स्तरावर उद्या रविवार देशभरात बंद ठेवण्यात आला असून घराबाहेर कोणालाही पडू नये असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. त्याअनुषंगाने जवळपास सर्वांनीच उद्या घराबाहेर न पडण्याचा जणू संकल्प घेतला असल्याचे सामान्य चर्चेतुन दिसून येते. उद्या भाजी बाजारारही बंद राहणार या खबरदारीमुळे अनेक व्यापार्यांनी चढ्या भावात भाजीपाला विक्रीस आज शनिवारी सुरूवात केली असल्याचे बुधवारी बाजारात फेरफटका मारल्यानंतर निदर्शनात आले. अगदी काल-परवापर्यंत १० रूपये किलोच्या भावाने मिळणारे टमाटर आज डबल भावात म्हणजे २० रूपये किलोने विकण्यात आले. मेथी, वांगी आणि सांबार १० रूपये पाव असा दुपारपर्यंत भाव होता. याच किंमती सायंकाळपर्यंत आणखी वाढविल्या जातील असे एक व्यापार्याने सांगीतले. जर असाच बंद ३१ मार्चपर्यंत कायम राहिला तर भाजीपाल्याचे भाव गगणाला भिडेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अशा पध्दतीने जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणार्यांवर संबंधित विभागाने योग्य वेळी कारवाई होणे गरजेचा उपाय ठरविला जाणार का ? असा प्रश्न सामान्य नागरिक आपल्या जागरूक प्रशासनाला करीत आहेत.
मद्य आणि खर्र्याचा काळा बाजार
शहरात शौकीनांची कमतरता नाही. त्यातच खर्र्याचा जन्मच मुळात नागपुरातून झाला. त्यामुळे नागपुरातील गल्लीबोळातील मुलसुध्दा या शौकाला अपवाद राहिले नाहीत. परिणामी हा धंदा कोठेही आणि कोणीही उघडून बसतो. मात्र, मद्य आणि पानठेलेदेखील बंद करण्यात आली असल्यामुळे हे धंदेवाले घरीच खर्रा बनवून तो बाहेर येवून चढ्या भावात विकत असल्याचे दिसून आले. काही मोठ्या पानठेलेवाल्यांना पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन दुकान बंद ठेवण्याच्या सूचना दिल्यात पण आडमार्गांनी त्यांनी खर्रा विकणे सुरूच ठेवले असल्याचे समजते. हिच पध्दत दारू विक्रीबाबतही कायम आहे.

