
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नवी दिल्ली – पीएम नरेंद्र मोदींनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू घोषित केला आहे. यामध्ये शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत देशभरातील पॅसेंजर रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मेल आणि एक्सप्रेस ट्रेन सुद्धा पहाटे 4 वाजेपर्यंत थांबवल्या जातील. यासोबतच लोकल ट्रेनच्या फैऱ्या सुद्धा कमी केल्या जाणआर आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनता कर्फ्यू दरम्यान, एकूण 2400 प्रवाशी ट्रेन बंद राहतील. यामध्ये 1300 मेल एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन आणि मोठ्या प्रमाणात लोकल ट्रेनचा समावेश आहे.
कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रवाशांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे आधीच 245 प्रवासी ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या ऑन बोर्ड केटरिंग सेवा बंद करण्याचे वेगळे आदेश जारी करण्यात आले आहेत. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिज्म कॉरपोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) कडून दिलेल्या माहितीप्रमाणे, संक्रमण थांबवण्यासाठी फूड प्लाझा, लोक आहार केंद्र आणि सेल किचन सेवा सुद्धा बंद करण्याचा निर्णय झाला आहे.
पीएम नरेंद्र मोदींच्या जनता कर्फ्यूला दिल्ली आणि बंगळुरूतील मेट्रोने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानिमित्त 22 मार्च रोजी गर्दी कमी करण्याच्या हेतूने मेट्रो सेवा तात्पुरत्या बंद केल्या जात आहे. दोन्ही शहरातील नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळणे आणि घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला. यासोबत हरियाणा सरकारने सुद्धा गर्दी टाळण्यासाठी आणि लोकांचा थेट संपर्क कमी करण्यासाठी रविवारचा दिवस सर्वच बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

