आज रामटेकमध्ये प्रसारमाध्यम कार्यशाळेचे आयोजन

254

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर

नागपूर/   रामटेक:- केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत नागपूर येथील पत्र सूचना कार्यालय यांच्‍या तर्फे , आज  शुक्रवार  20 मार्चला  स्थानिक हॉटेल   ग्रीनलँडव्हिलेज रिसॉर्ट रामटेक  येथे   प्रसारमाध्‍यम कार्यशाळा ‘वार्तालाप’चे  सकाळी  11 ते सायंकाळी 5.15  या कालावधीत आयोजन करण्‍यात आले आहे.

रामटेकचे नगराध्यक्ष दिलीप देशमुख   या कार्यशाळेचे उद्घाटन करतील .  उद्घाटन समारंभ सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत   होईल.

उद्‌घाटन सत्रानंतर  पत्रकारांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले असून,  या  कार्यशाळेत तीन तांत्रिक सत्रामध्ये  व्याख्याने होणार आहेत.  दुपारी 12 ते 1.45 दरम्यान होणा-या प्रथम तांत्रिक सत्रामध्ये ‘पर्यावरणा संदर्भात वृत्तांकनात प्रसारमाध्यमांची  भूमिका ’ यावर नागपूर आकाशवाणी वृत्त विभागाच्या सहायक संचालिका  गौरी मराठे  मार्गदर्शन करतील.    ‘विकास संवादामध्ये पत्रकारांची भूमिका’ याविषयावर रायपूर दूरदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. मनोज सोनोने  मार्गदर्शन करतील.   ‘ कोरोना महामारीच्या अफवांना आळा घालण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका ’  या विषयावर    भंंडा-याचे  जिल्हा  माहिती अधिकारी रवी गिते मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी 2.30  ते 3.45  दरम्यान होणा-या   दुस-या तांत्रिक सत्रात,  पत्रकार दिपक गिरधर,  हे ‘ग्रामीण  क्षेत्रात प्रभावी जनसंवादासाठी वृत्तपत्रांची भूमिका या विषयावर व्याख्यान देतील. कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. रेणुका बोखारे ‘ विकास संवादात समाज माध्यमांची भूमिका’यावर विचार मांडतील. रामटेकमधील  पत्रकार     राकेश मर्जिवे हे ‘ग्रामीण  क्षेत्रात प्रभावी जनसंवादासाठी  माध्यमांची भूमिका. या विषयावर व्याख्यान देतील.  शेवटच्या तांत्रिक सत्रामध्ये  पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे  सहाय्यक  संचालक श्री शशिन्‌ राय  ‘विकास-संवाद आणि  पत्र सूचना कार्यालय’  या विषयावर  सादरीकरण करतील.

सायंकाळी ४.४० ते ५.१५ दरम्यान प्रतिसाद- संकलन व कार्यशाळेचा समारोप होईल.