
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर :- एकीकडे करोना संक्रमणावर नियंत्रणासाठी जगभरासह देशात आणि राज्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच लोकांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहनही करण्यात येत असताना दुसरीकडे अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात गेल्या अनेक वर्षांपासून मेस आणि परिसरातील कचरा मोकळ्या जागेत फेकण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वसतिगृहात नियमीत स्वच्छतेचे कंत्राट खासगी कंत्राटदाराला देण्यात आले असून त्याच्याकडून, मात्र साप्ताहिकही स्वच्छता होत नसल्याची माहितीही नाव न छापण्याच्या अटीवर विद्यार्थ्यांनी दिली.
विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील वसतिगृहात सुमारे ७५० विद्यार्थी राहतात. याठिकाणी दोन मेसही संचालित होतात. मेसमधील उरलेले अन्न आणि इतर कचरा तसेच इतर कचरा उघड्यावर फेकण्यात येत असल्याने परिसरात डासांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी आजारी देखील पडतात. ही बाब अनेकवेळा अधीक्षक आणि कार्यालयातील बाबूकडे विद्यार्थ्यांनी केल्यावरही याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही.
वसतिगृहाच्या स्वच्छतेसाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंत्राटदाराकडून अधीक्षकांना आणि त्यांच्याकडून विद्यापीठाला कंत्राटदाराने जमा केलेली बिले नियमीत पाठविण्यात येतात. मात्र स्वच्छता होत आहे की नाही, याची पडताळणी करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अस्वच्छतेसंदर्भात विद्यार्थी मागील दीड वर्षांपासून वेळोवेळी कार्यालयातील बाबूला तक्रार करीत आहेत. तसेच वसतिगृह अधीक्षकांकडेही लिखीत स्वरूपात अनेकवेळा तक्रार केली आहे. याशिवाय काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अधीक्षकांकडे तक्रार करूनही स्वच्छता होत नसल्याची लिखीत तक्रार कुलगुरूंकडे केली होती. यावर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासनही कुलगुरुंनी दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही कुलगुरूंची चौकशीच संपली नसल्याने विद्यार्थ्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वसतिगृहातील शौचालय आणि स्नानगृह विविध वसतिगृहातील ब्लॉकमधील खोल्यांना लागून आहेत. मात्र याठिकाणीही नियमीत होत नाही. तसेच अनेक आठवड्यांपर्यंत याठिकाणी शौचालयाचे सांडपाणी साचते. परिणामी विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये डांसांचा त्रास होत असतो तसेच वसतिगृहात कचरा उचणारी यंत्रणाच नसून येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचीही काही व्यवस्था नाही हे विशेष.
परिसरात अस्वच्छतेसाठी नागपूर महापालिकेतर्फे नुकतेच रविभवन व्यवस्थापकांना दंड ठोठावण्यात आले होते. कचरा विलगीकरणासंदर्भातही कठोर कारवाईचा देखावा प्रशासनाकडून करण्यात येत असतो. मात्र, विद्यापीठाच्या वसतिगृहातील अस्वच्छतेसंदर्भात दोषींवर कारवाई करण्याचे धाडस मनपा प्रशासन दाखवेल का? असा सवाल विद्यार्थी करीत आहेत.
कचरा आणि अस्वच्छतेबाबत तक्रार प्राप्त झाल्यावरच त्यावर कारवाई करण्यात येते. विद्यापीठ वसतिगृह परिसरात आम्ही आतापर्यंत पाहणी केली नसून त्यामुळे कारवाई करण्यात आली नाही. नागरिकांना स्वच्छतेसंदर्भातील कुठलीही तक्रार असल्यास १८००२३३३७६३ या क्रमांकावर सकाळी १० ते ६ वेळेत संपर्क साधावा.

