
विदर्भ वतन न्युज पोर्टल, गोंदिया
गोंदिया – गोंदिया :- परदेशातून विदर्भाच्या भूमीत पाय ठेवलेल्या कोरोनाची दहशत सध्या शहरासह जिल्ह्यात आहे. स्वच्छता हाच रामबाण उपाय, असेही प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. परंतु, प्रशासनाचाच एक भाग असलेल्या नगर पालिकेला स्वच्छतेचा विसर पडला आहे. रेल्वेस्थानकाजवळच्या प्रभू रोडवरील दृश्य पाहून नगर पालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत ‘कोरोना‘ची बाधा तर झाली ना? असा प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहणार नाही. वर्दळीच्या या रस्त्यावर दारूच्या बॉटल्स, पाण्याच्या पाऊचचा सडा पडला असून, सारा परिसर दुर्गंधीने नटल्याचे बघितल्यानंतर हे प्रभू म्हणण्याची वेळ आली आहे.
व्यापारीनगरी म्हणून गोंदिया शहराची ओळख आहे. या शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयांचा डेरा आहे.मोठमोठे व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. शिवाय दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वेस्थानकदेखील आहे. रेल्वेची सुविधा असल्याने नागपूर आणि रायपूर या दोन्ही बाजूने आवागमन करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. कोणी कामानिमित्त तर कोणी नोकरीनिमित्त शहरात पाय ठेवतो. त्यामुळेच की काय, रेल्वेस्थानकाजवळच्या प्रभूरोडवर मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, खानावळ, महिला अर्बन बँकसहनागपूरातून प्रकाशित होणाऱ्या एका वृत्तपत्रासह अन्य कार्यालये वसली. रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी ‘शार्टकट‘ म्हणून प्रभू रोडने अधिक आवागमन करतात. सद्यःस्थितीत या मार्गावरील नागरिकांची ये-जा वाढली आहे. परंतु, या वर्दळीच्या ठिकाणाकडे स्वच्छतेच्या बाबतीत नगर पालिकेचे लक्ष गेले नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दारूच्या बॉटल्स, पाण्याच्या पाऊचचा सडा पडलेला आहे. कित्येक दिवस हा कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधीने कळस गाठला आहे. नाकावर रुमाल मांडूनच प्रवाश्यांसह अन्य सामान्य नागरिक व व्यापाराऱ्यांना आवागमन करावे लागते. उल्लेखनीय म्हणजे, या परिसरात आजबाजूला मुतारीची कोणतीही सोय नाही. त्यामुळे ऐन रस्त्यावर उघड्यावर लघूशंका करण्याचे प्रमाणही वाढले आहे. डुकरांचा हैदोस हा नेहमीचाच झाला आहे. दरम्यान, स्वच्छतेचा ढिनडोरा पिपटणाऱ्या नगर पालिकेने कोरोनाने गोंदिया शहरात पाय रोवूच नये, म्हणून या परिसरात ताबडतोब स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आवारभिंतीआड रंगतात दारूड्यांच्या पार्ट्या रेल्वेस्थानक परिसरात म्हणजेच, या रस्त्यावर देशी, विदेशी दारूचे दुकान आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या नशेत तर्रर्र राहणाऱ्यांची संख्याही कमी नाही. रात्रीला मात्र, दारूड्यांचा घोळका या रस्त्याशेजारी हमखास पाहायला मिळतो. आवारभिंतीआड दारूड्यांच्या पार्ट्या रंगताना दिसतात. नशेत असताना त्यांच्यातील अश्लिल हावभाव आवागमन करणाèया महिला,मुलींना शरमेने मान खाली घालण्यास भाग पाडते.

