Home चंद्रपूर मनपाची प्लास्टीक विरोधात कारवाई

मनपाची प्लास्टीक विरोधात कारवाई

58 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर

चंद्रपूर  –  प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेने प्लास्टिक जप्ती मोहिमेअंतर्गत झोन क्र. 2 अंतर्गत कस्तुरबा रोड, जेल रोड, विजय टॅकीज रोड, गिरणार हाॅटेल रोड परिसरातील पान टपरी, नाश्ता टपरी, फुल विक्रेते, फळ विक्रेते, हाॅटेल, कापड दुकान, किराणा  दुकान, भाजी विक्रेते तसेच अन्य व्यवसाय प्रतिष्ठानांची कसून तपासणी करण्यात आली. सदर कार्यवाहीत १० ते १२ किलोग्रॅम प्लास्टीक व तत्सम साहित्य जप्त करण्यात आले असून दंड रुपये ८,५००/-  वसूल करण्यात आला. प्लास्टीकचा दैनंदिन जीवनात वापर न करण्याबाबत सक्त ताकीद याप्रसंगी देण्यात आली तसेच बंदी असलेल्या प्लास्टीक बाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सिंगल यूज प्लास्टिक वापरास पूर्णपणे बंदी आहे, प्लास्टीक पिशवी, नॉन वोवन बॅग्स ( पॉलीप्रोपिलीन ), शॉपिंग बॅग्स, खर्रा पन्नी याची विक्री व खरेदी यावर पुर्णपणे बंदी आहे तसेच यांचे पालन न करण्याच्या पहिल्या गुन्ह्यास रुपये ५०००/-, दुसऱ्या गुन्ह्यास रुपये १०,०००/- व तिसऱ्यांदा गुन्हा केला असल्यास रुपये २५००० दंड  व ३ महिन्यांचा कारावासाची तरतूद कायद्यानुसार करण्यात आली आहे. प्लास्टीक बंदीचे पोस्टर्स संबंधित प्रतिष्ठानांवर लावण्यात येऊन जनजागृतीही करण्यात येत आहे.
मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. गोठे, श्री. मडावी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता निरीक्षक श्री. मैलारपवार, श्री. राजूरकर, श्री. हजारे , श्री. ढवळे, प्रभाग शिपाई तसेच मनपा कामगार व सेक्युरीटी गार्ड यांच्या उपस्थितीत संयुक्तपणे ही मोहीम राबविण्यात येत आहे.