Home चंद्रपूर मोहिमेस विरोध दर्शविणाऱ्या नागरिकांचा विरोध मावळला

मोहिमेस विरोध दर्शविणाऱ्या नागरिकांचा विरोध मावळला

179 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर

चंद्रपूर  – चंद्रपूर शहर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे शहरात हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम यशस्वीरीत्या राबविली जात आहे. मोहिम सुरळीतपणे पार पडण्यास आरोग्य विभाग प्रयत्नरत आहे. मनपाच्या सातही शहरी प्राथमीक आरोग्य केंद्रांतर्फे औषधांच्या गोळ्या प्रत्यक्ष समोर उपस्थित राहुन सेवन करण्यास दिल्या जात आहे. यादरम्यान शहरी प्राथमीक आरोग्य केंद्र  3 तर्फे या मोहीमेत काही मुस्लिम वस्ती असलेल्या परीसरात ही मोहीम राबविण्यात येत असतांना तेथील बहुतांश लोकांनी गैरसमजुतीमुळे, अफवांमुळे हत्तीरोग प्रतिबंधासाठी असलेल्या गोळ्यांचे सेवन करण्यास विरोध दर्शविला. त्यांच्याशी सामंजस्याने बोलून त्यांना लसीकरणासाठी तयार करणे हे मनपासाठी आव्हानच होते.

याकरीता आयुक्त संजय काकडे यांच्या निर्देशानुसार,  डॉ. कीर्ती राजूरवार यांच्या नेतृत्वात रहमतनगर येथील भागात श्रीमती ऐश्वर्या सोनटक्के ( नर्स मिडवाईफ) यांनी विरोध दर्शविणाऱ्या नागरीकांसाठी सामंजस्य सभेचे आयोजन केले.  या सभेकरीता  तेथील नगरसेविका श्रीमती सकिना अंसारी, श्रीमती विना खनके व खाजगी वैद्यकिय व्यावसायीक डॉ. आरीफ रहमान तसेच मदरसामधील मोलवी श्री नबी व त्यांचे सहकारी यांनी तेथील रहिवाश्यांना हत्ती रोगाच्या औषधी गोळया सेवन करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी त्यांच्या शंका, त्यांचे प्रश्न  याप्रसंगी मांडले. त्याचे विस्तृत निराकरण डॉ. विजया खेरा  व  पि. सी. आय. चे महेश झरकर यांच्यामार्फत करण्यात आले. या गोळ्या सेवन करण्याने होणारे फायदे त्यांना समजावून सांगण्यात आले, सदर औषधे सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. डॉ आरिफ रहमान यांनी स्वतः  गोळ्यांचे सेवन करून गोळी सुरक्षित असल्याची हमी दिली.  त्यानंतर  तेथे उपस्थित  सर्व नागरिकांनी औषधी गोळ्यांचे सेवन करू मोहीमेस सहकार्य केले. याप्रसंगी हत्तीरोग दुरीकरण मोहीम यशस्वी करण्याकरिता शपथ देखील घेण्यात आली तसेच डॉ. विजया खेरा यांनी कोरोना वायरस बाबत माहिती देऊन त्या बाबत काळजी कशी घ्यावी कशी काळजी कशी घ्यावी हे सांगितले. सततचे प्रयत्न आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतत पाठपुरावा केल्याने मोहिमेदरम्यानचा हा अडथळा यशस्वीरीत्या पार करण्यात आला.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील हत्तीरोगासाठी संवेदनशील असलेल्या नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम (आय.डि.ए.) दिनांक 2 ते 20 मार्च या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. हत्तीरोग दुरीकरणाच्या दृष्टीने सदर मोहीम अत्यंत महत्वाची असून यापूर्वी सदर मोहिमेत निवडलेल्या लोकसंख्येतील गरोदर माता, २ वर्षाखालील बालके व अतिगंभीर रुग्ण वगळता राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांना डी ई सी व अल्बेडॉझाल गोळ्यांची एक मात्रा  खाऊ घातली जात होती. केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आयवरमेक्टिन (Ivermectine) नावाचे तिसरे औषध डी ई सी व अल्बेडॉझाल गोळ्यांसोबतच  सर्व लोकांना वयोगटानुसार ( ५ वर्षाखालील / ९० से. मी. पेक्षा कमी उंची असलेल्या ( मूल, गरोदर माता व गंभीर रुग्ण आजारी ) दिले जाणार आहे. याप्रमाणेच  चंद्रपूर जिल्ह्यातील एमडीए साठी प्रथमच डी ई सी + अल्बेडॉझाल +  आयवरमेक्टिन या तीन औषधांचा वापर करण्यात येत आहे.
महापौर सौ. राखी कंचर्लावार व आयुक्त श्री. संजय काकडे, यांच्या मार्गदर्शनात तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कीर्ती राजूरवार यांच्या प्रत्यक्ष व प्रभावी नियंत्रणात डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. अश्विनी भारत, डॉ. अलका अकुलवार, डॉ. वनिता गर्गेलवार,डॉ. नयना उत्तरवार, डॉ. नरेंद्र जनबंधू व आरोग्य विभाग कर्मचारी  नियोजनबद्ध पद्धतीने व समर्पण भावनेने काम करीत असून हत्तीरोग दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यास चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रयत्नरत आहे.