वनकामगारांचे वन कार्यालयासमोर उपोषण, आंदोलनाचा तिसरा दिवस

244

विदर्भ वतन न्युज पोर्टल, गोंदिया

राधाकिसन चुटे / जिल्हा / प्रतिनिधी गोंदिया

गोंदिया :- महाराष्ट्र राज्य वन कर्मचारी व वन कामगार युनियनच्या नेतृत्त्वात वन कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन बुधवारपासून (दि.४) येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून, आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मात्र वन विभागाने अद्यापही वन कामगारांच्या उपोषणाची दखल घेण्यात आली नाही. वन कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे वांरवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याची शासनाने दखल घेतली नाही. वन कामगारांनी बुधवारपासून राज्यव्यापी धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील वन कामगारांनी युनियनच्या नेतृत्त्वात येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.योगराज गोंडाणे, भरत बावनथडे, सेवक नागपूरे, सुरज मडावी या वन कामगारांचा यात समावेश आहे. दरवर्षी २४० दिवस आणि चौदा ते पंधरा वर्षे काम केलेल्या बारमाही वन कामगाराला सेवेत सामावून घेण्यात यावे, ६० वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त कामगारांना कामावरुन बंद करुन त्या जागेवर अनुभवी बारमाही बंद केलेल्या कामगारांना घेण्यात यावे. बोगस कामगारांना घेणे बंद करुन अनुभवी कामगारांना घेण्यात यावे, सेवानिवृत्त झालेल्या चौकीदारांच्या जागेवर बारमाही वन कामगारांना घेण्यात यावे, फायर वाचर म्हणून कामगारांना घेण्यात यावे, गोंदिया वन विकास महामंडळातंर्गत हंगामी कामगारांना ६० वर्षांनंतर ईपीएफचे पैसे काढण्याची परवानगी देण्यात यावी. बारमाही कामगारांची कमतरता असून त्यांची भरती करण्यात यावी. एकाच रेंजमध्ये तीन वर्षे झालेल्या गार्ड आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी. यासह अन्य मागण्यांना घेऊन वन कामगारांनी उपोषण सुरू केले आहे. याची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विनायक साखरे, भाऊलाल ठाकरे, मनोहर जांभुळकर, शंकर सातार, पद्म घाटघुंबर, धर्मपाल बांबोळे, गालीब शेख,  नोवालाल रहांगडाले, भास्कर येल्ले, सेवक नागपूरे, पुरण सेंदरे यांनी दिला आहे.