विनाकारण गर्दी करू नका आणि धुळवडही मर्यादेत खेळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

251

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर 

वृत्तसंस्था – ‘करोनामुळं  राज्यात चिंतेचं वातावरण नाही. मात्र, काळजी घेणं गरजेचं आहे. राज्य सरकार आवश्यक त्या उपाययोजना करतेच आहे. पण नागरिकांनीही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. गरज नसताना गर्दी करू नका आणि धुळवडही मर्यादेत खेळा,’ असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं.

जगभरात फोफावत चाललेला ‘करोना’ व्हायरस आणि त्यामुळं महाराष्ट्रात पसरलेल्या भीताच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदन केलं. ‘राज्यात चिंतेचं वातावरण नाही, असं त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. ‘करोना’चा सामना करण्यासाठी सरकार सर्व उपाययोजन करत आहे. मुंबई, पुणे, नागपूर येथे करोनाचं निदान करण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत. जनजागृती करण्यासाठी जाहिराती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विमानतळांवरही खबरदारी घेण्याचे आदेश दिले गेले आहेत. खासगी रुग्णालयातही स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

‘होळी हा आनंदाचा सण आहे. त्यात अमंगल सर्व जाळून टाकण्याची प्रथा आहे. करोनाचं संकटही यंदाच्या होळीत जळून खाक होईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. ‘यापूर्वी स्वाइन फ्लूच्या संकटाच्या वेळी दहीहंडी उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. अनेक मंडळांनी स्वयंस्फूर्तीनं दहीहंडी उत्सव रद्द केले होते. यावेळी हे भान राखलं जाईल. नागरिकांनी तसं ते राखावं,’ असं आवाहनही उद्धव यांनी केलं.