Home नागपूर शिक्षकांनी जाणून घेतले पाहिजे आपल्या सोबत विघार्थ्यांचा चुका

शिक्षकांनी जाणून घेतले पाहिजे आपल्या सोबत विघार्थ्यांचा चुका

120 views
0
  • जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांसाठी मूल्यवर्धन कार्यशाळेचे आयोजन

        विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

नागपूर :- ‘विद्यार्थ्यांना वर्गात प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. आपण शिकविलेले विद्यार्थ्यांना समजते का, हे शिक्षकांनी जाणून घेतले पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या मुद्द्यावरून आपण स्वत:मध्ये सुधारणा करतो का, याचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे. संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांची अंमलबजावणी शाळेपासून केली जावी’, असे मत नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशनच्यावतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांसाठी मूल्यवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सुरेश भट सभागृहात हा मेळावा आयोजिण्यात आला होता. यावेळी संजीवकुमार बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, शिक्षण समितीच्या सभापती भारती पाटील, राज्य विज्ञान संस्थेचे संचालक रवींद्र रमतकर, मुथ्था फाउंडेशनचे शांतीलाल मुथ्था, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, महापालिकेच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

‘संविधानातील न्याय, स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांची अंमलबजावणी तातडीने करण्याची गरज आहे. परीक्षेत किती गुण मिळाले, हे नंतर कुणीही विचारत नाही. प्रत्यक्ष काम करीत असताना तुम्ही कोणती मूल्ये बाळगता, इतरांशी कसे वागता, हेदेखील महत्त्वाचे असते. तुम्ही कोणत्या मूल्यांना महत्त्व देता, याचा प्रभाव कार्यतत्परतेवरही पडत असतो. आयुष्यात यश मिळविणे आणि अर्थपूर्ण आयुष्य जगणे यासाठी मूल्ये गरजेची असतात’, असे संजीवकुमार म्हणाले. मुलांमधील सर्जनशीलता जागविणे, त्यांना वेगळा विचार करू देणे, त्यांना व्यक्त होऊ देणे हे काम शिक्षकांनी करावे, असेही विभागीय आयुक्त म्हणाले.

मूल्यांची जपणूक स्वत:पासून करावी, असा सल्ला मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी दिला. उपदेश देणे सगळ्यांना आवडते, मात्र प्रत्यक्ष काम करणे महत्त्वाचे आहे, असे यादव म्हणाले. इतर मान्यवरांनीदेखील उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. एकनाथ पवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर प्रफुल्ल पारेख यांनी आभार मानले.