Home चंद्रपूर मनपाची प्लास्टीक विरोधात कारवाई

मनपाची प्लास्टीक विरोधात कारवाई

536 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर

चंद्रपूर – प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेने प्लास्टिक जप्ती मोहिमेस प्रारंभ केला असून ३ फेब्रुवारी रोजी सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. गोठे, स्वच्छता निरीक्षक श्री. मैलारपवार, श्री. राजूरकर, श्री. हजारे , श्री. ढवळे, प्रभाग शिपाई तसेच मनपा कामगार यांच्या उपस्थितीत संयुक्तपणे धडक मोहीम राबवून झोन क्र. २ अंतर्गत क्षेत्र अंचलेश्वर गेट ते बांगला रोड, माता महाकाली मंदिर परिसर पान टपरी, नाश्ता टपरी, फुल विक्रेते, फळ विक्रेते, हाॅटेल तसेच अन्य व्यवसायांची कसून तपासणी करण्यात आली. सदर कार्यवाहीत अंदाजे दहा ते बारा किलोग्रॅम प्लास्टीक व तत्सम साहित्य जप्त करण्यात आले असून १३,५००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील पानठेल्यांवर अनेकदा खर्रा प्लास्टिक पन्नीमध्ये बांधून देण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. पानठेलेवाल्यांना अनेकदा सूचना देऊनसुद्धा खर्रा देताना पन्नीमधे देणे बंद करीत नाही. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेने खर्रा पन्नीचा वापर करणाऱ्या पानठेल्यांवर तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानां विरोधात कारवाई सुरू केली आहे.
माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सिंगल यूज प्लास्टिक वापरास पूर्णपणे बंदी आहे, प्लास्टीक पिशवी, नॉन वोवन बॅग्स ( पॉलीप्रोपिलीन ), शॉपिंग बॅग्स, खर्रा पन्नी याची विक्री व खरेदी यावर पुर्णपणे बंदी आहे तसेच यांचे पालन न करण्याच्या पहिल्या गुन्ह्यास रुपये ५०००/-, दुसऱ्या गुन्ह्यास रुपये १०,०००/- व तिसऱ्यांदा गुन्हा केला असल्यास रुपये २५००० दंड व ३ महिन्यांचा कारावासाची तरतूद कायद्यानुसार करण्यात आली आहे. याबाबत मनपाद्वारा जनजागृतीही करण्यात येत आहे.
नागरिकांनी महापालिकेच्या या मोहिमेत सहभागी होऊन कापडी पिशव्यांचा वापर सुरू करावा,दुकानदारांवर अवलंबून न राहता घरातून कापडी पिशवी नेऊन सामान खरेदी करावे, दुकानदारांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. तसेच नागरिकांनी पानठेलेवाल्यांकडून पन्नीमध्ये खर्रा विकत घेऊ नये व शहर स्वच्छतेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.