Home नागपूर बांगलादेशी असल्याचा संशयातून पोलिसांनी १२ युवकांची केली धरपकड, युवकांची केली चौकशी

बांगलादेशी असल्याचा संशयातून पोलिसांनी १२ युवकांची केली धरपकड, युवकांची केली चौकशी

165 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

नागपूर – बांगलादेशी नागरिक असल्याच्या संशयातून १२ युवकांची पाचपावली पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्यामुळे बांगलादेशी नागरिक पकडल्याच्या वृत्ताने मंगळवारी शहरात खळबळ उडाली होती. पाचपावली पोलिस व दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवारी दिवसभर या युवकांची चौकशी केली. सर्वजण पश्चिम बंगालमधील नंदीग्राम येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

पाचपावली पोलिस सोमवारी रात्री गस्त घालत होते. बाळाभाऊपेठ परिसरात एक युवक पोलिसांना संशयास्पद स्थितीत फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली. साथीदारांसह भाड्याने राहात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. हा युवक बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी युवक व त्याच्या ११ साथीदारांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये आणले. दहशतवाद विरोधी पथक व दहशतवाद विरोधी सेललला याबाबत माहिती देण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारीही पाचपावली पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले. मंगळवारी दिवसभर युवकांची कसून चौकशी करण्यात आली. नंदीग्राम येथील पोलिस अधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्यात आला. सर्व युवक नंदीग्राममधील असल्याची खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडले. सर्व जण कापडावर नक्षीकाम करण्याचे काम करतात.