विद्यार्थिनींना कारची धडक

195
  • दोन अपघातांत तीन गंभीर, दोन जखमीअपघातात शाळकरी मुलींचा ही समावेश
  • सावरी, गुमाधावडा येथील घटना

       विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया 

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात भरधाव वेगात असलेल्या दोन वाहनांचा अपघात दोन ठिकाणी झाला आहे. या दोन्ही घटनांमध्ये तीघे गंभीर, तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज ३ मार्च सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास घडली. पहिली घटना बालाघाट मार्गावरील सावरी येथे घडली. या घटनेत तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या. यातील एकीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर गोंदिया येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर दुसरी घटना तिरोडा तालुक्यातील गुमाधावडा बस स्थानकाजवळ घडली. यात कार चालकासह इतर एकजण जखमी झाला असून त्यांना तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • विद्यार्थिनींना कारची धडक

गोंदिया ते बालाघाट मार्गावरील रावणवाडी जवळ असलेल्या सावरी येथील इयत्ता नववी आणि आठवीच्या तीन विद्यार्थिनी रावणवाडी येथील गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित विद्यालयात शिक्षण घेतात. आज मंगळवारपासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाल्यामुळे शाळा सकाळपाळीत ठेवण्यात आली आहे. सुटी झाल्यामुळे सावरी येथील इयत्ता नववीची मेघा बिसेन, प्राची बघेले आणि इयत्ता आठवीची हिना बघेले या तिन्ही विद्यार्थिनी घराकडे सायकलने परतत होत्या. दरम्यान सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास सावरी बसस्थानकानजीक बालाघाटच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या इंडिका गाडी (क्र. एमएच ३५, पी ३२०६) ने त्यांना धडक दिली. यात त्या तिन्ही विद्यार्थिनी जखमी झाल्या. यातील प्राची आणि हिना या दोघींवर गोंदिया येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले. मेघा बिसेन हिच्यावर सहयोग रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने कारची तोडफोड केली. नागरिकांचा एकच उद्रेक बघावयास मिळाला. रावणवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

  • ओव्हरटेकच्या नादात कार उलटली

तिरोडा कडून जाणारी बलेनो गाडी(एमएच ३५ पी ७५२०) च्या चालकाने गुमाधावडा बसस्थानकावर ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली. यात चालकासह दोघेजण जखमी झाले. ही घटना आज ३ मार्च ला सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. चालकाचे नाव गणेश लांजेवार रा. काटी असे आहे. गणेश लांजेवार आणि कुणाल कटरे बलेनो कारने जात होते. दरम्यान कार उलटली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत चालकासह जखमी झालेल्या दोघांनाही उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आले आहे.