दिल्लीतील हिंसाचारावर जोरदार गदारोळ, विरोधी पक्षांनी शहांच्या राजीनाम्याची मागणी केली

213
  • दोन्ही सभागृहात विरोधकांचा गाेंधळ

      विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

वृत्तसंस्था  – संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रास सोमवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत दिल्ली हिंसाचारावर जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस, तृणमूल, सपा, बसपा, द्रमुक व डाव्या पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचबरोबर हिंसाचारावर पंतप्रधानांनी सभागृहात भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही लावून धरली. त्यावर लोकसभेतील संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत ३ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावर मौन बाळगले गेले. कारवाई केली नव्हती. तेच लोक आता संसदेत गदारोळ करू लागले आहेत. दिल्लीतील हिंसाचारावर चर्चा करण्यासारखी सध्या परिस्थिती नाही. परंतु परिस्थिती सुधारेपर्यंत आपण प्रतीक्षा करायला हवी, असे लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी सांगितले. मात्र विरोधकांनी त्यांचे एेकले नाही. गदारोळ वाढला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. राज्यसभेत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, दिल्लीत तीन दिवस हिंसाचार होत असताना केंद्र सरकार झोपले होते. या प्रकरणात सभागृहात चर्चा व्हायला हवी. त्यावर सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले, दिल्लीत अजूनही परिस्थिती सामान्य नाही. अशात चर्चा करणे योग्य नाही.

लोकसभेत भाजप, काँग्रेसच्या दोन महिला खासदारांना धक्काबुक्की झाली. काँग्रेस खासदार राम्या हरिदास यांनी लोकसभाध्यक्ष बिर्ला यांच्याकडे लेखी तक्रार केली. भाजप सदस्य जसकौर मीणा यांनी मला मारहाण केली. मी मागास समुदायातील व महिला असल्याने माझ्याशी असे वर्तन केले जाते? त्यावर जसकौर यांनी उत्तर दिले- राम्या यांनी सभागृहात बॅनर उघडले. तेव्हा ते माझ्या डाेक्यात लागले. मी त्यांना धक्का दिला. मीही मागास समुदायातील आहे.

माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले, केंद्राने ठरवले असते तर दिल्लीतील दंगल रोखता आली असती. परंतु केंद्र झोपलेले होते. नेत्यांच्या इशाऱ्यावर दंगली झाली. लोकांनी नेत्यांची भाषणे एेकली होती. दिल्लीत हिंसाचार पूर्वीही झाला होता. तेव्हा आक्रमणकारी कत्तली करत. नादिरशाह, अहमद शाह अब्दाली यांनी दिल्लीवर हल्ले केले होते. मात्र सरकारने दंगल रोखण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, असे लोक पहिल्यांदाच म्हणत आहेत.