‘युद्धस्य कथा रम्या’ च्‍या प्रयोगाला पुणेकरांची दाद

7

विदर्भ वतन वृत्तपत्र /न्यूज पोर्टल :  नागपूर

9 नोव्‍हेंबर 2022 नागपूर स्थित ईटीईश्री आर्टस् अकादमी निर्मित ‘युद्धस्य कथा रम्या’ या एकपात्री कार्यक्रमाला पुणेकरांनी चांगलीच दाद दिली. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत पुण्याच्या प्रतिष्ठित सुदर्शन रंगमंचावर मराठी रंगभूमीदिनाच्या पर्वावर हा प्रयोग सादर करण्‍यात आला होता.
महर्षी व्यासांनी रचलेल्या महाभारत या महाकाव्यातील पात्रांच्या मांदियाळीतले सगळ्यात व्यामिश्र आणि जटिल पात्र म्हणजे श्रीकृष्ण! महाभारताचे युद्ध टाळण्याचा निकराचा प्रयत्न श्रीकृष्णाने केला, परंतु हे युद्ध अटळ आहे असे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा, त्याने ते अर्जुनाला लढायला लावले. श्रीकृष्ण महाभारताच्या युद्धात संलिप्तही होता आणि अलिप्तही होता. श्रीकृष्णाच्या दृष्टिकोनातून महाभारताच्या युद्धाकडे बघण्याचा आगळावेगळा अनुभव ‘युद्धस्य कथा रम्या’ या एकपात्री कार्यक्रमांतून सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली मकरंद घोंगे यांनी सादर केला. त्‍यांनी एकूण सोळा पात्रे या प्रयोगात लीलया अभिनित केली, याचे पुणेकरांनी कौतूक केले. एखादया स्त्रीने कृष्ण या प्रमुख पात्राव्यतिरिक्त इतकी पुरुषपात्रे साकार करण्याची ही अलीकडच्या काळातील दुर्मिळ घटना असावी.
ख्यातकीर्त लेखक, अभिनेता, दिग्दर्शक डॉ. पराग घोंगे यांनी यांच्‍या दिग्दर्शनात हा प्रयोग सादर केला. नेपथ्य सतीश काळबांडे यांचे होते तर प्रकाशयोजना किशोर बत्तासे यांची होती. अनिल इंदाणे यांच्‍या संगीत संयेाजन होते. श्रेया मकरंद घोंगे यांचेही प्रयोगाच्‍या यशस्‍वीतेसाठी सहकार्य लाभले.