Home नागपूर विदर्भातील उद्योगाचे दुर्गम भागात विकेंद्रीकरण आवश्यक – केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री...

विदर्भातील उद्योगाचे दुर्गम भागात विकेंद्रीकरण आवश्यक – केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांचे प्रतिपादन I

17 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर 12 मार्च 2022

विदर्भातील उद्योगाचे विकेंद्रीकरण आवश्यक असून भंडारा-गोंदिया गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देखील कृषी तसेच ग्रामीण आधारित व्यवसाय, उद्योग  निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केली. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अधीन नागपूरच्या एम एस एम ई विकास संस्था तसेच विदर्भातील विविध उद्योजक आणि उद्योग संघटनांच्या सहकार्याने नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरात तीन दिवसीय (12 ते 14 मार्च)  खासदार औद्योगिक  महोत्सवाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होत. याप्रसंगी राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, औद्योगिक विकास महामंडळ -एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, एम एस एम ई विकास संस्थेचे संचालक पी. एम. पार्लेवार प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाने ज्या औद्योगिक एकक किंवा कंपन्यांनी उत्पादन थांबवले आहे त्यांच्या खाली असलेल्या औद्योगिक जागा ज्यांना गुंतवणूक करायची आहे अशांना द्यावेत. या जागाच्या विक्रीसंदर्भात  एक धोरण एमआयडीसीने तयार करावे अशी सूचना गडकरी यांनी यावेळी केली . विदर्भात तयार कपडे – गारमेंटचे क्लस्टर तयार व्हावेत, संत्रा कापूस यावर प्रक्रिया तयार होणारे तंत्रज्ञान कौशल्य प्रशिक्षण देण्यात यावे असेही गडकरी यांनी सांगितलं. विदर्भात असणाऱ्या रक्षा उत्पादक कंपन्यांनी वाहन उद्योगाला लागणारे सीएनजी सिलेंडर तसेच सेमीकंडक्टरची निर्मिती  केल्यास देशामध्ये या सुट्या भागाचा तुटवडा भासणार नाही. मॅगनीज ओअर इंडिया लिमिटेडने – मॉईलने उत्पादन वाढवण्याची गरज असून देशाच्या गरजेनुसार मॅगनीजचे उत्पादन आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

ज्याप्रमाणे नागपूर मध्ये खासदार क्रीडा महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रतिसाद मिळत आहे तसाच प्रतिसाद खासदार औद्योगिक महोत्सवाला मिळेल. पुढच्यावर्षी सर्व उद्योग संघटनांना एकत्र आणून खाद्यप्रक्रिया, संत्रा, कापूस प्रक्रिया अशा विविध क्षेत्रांवर भर देऊन अधिक भव्य स्तरावर  या औद्योगिक महोत्सवाचे आयोजन केले जाईल असेही त्यांनी सांगितलं. नागपूरच्या अमरावती रस्त्यावरील डॉ .पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर प्रस्तावित असणाऱ्या 180 एकरवरील ‘ऍग्रो कन्व्हेंशन सेंटर ‘ ची सुद्धा त्यांनी माहिती दिली.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते याप्रसंगी ‘सर्विसवाला’ ॲपचे तसेच ‘उद्योजक विश्व’  या पत्रिकेचे अनावरण करण्यात आले.

 एम एस एम ई चे संचालक पी. एम. पार्लेवार यांनी, या तीन दिवसीय महोत्सवात 75 स्टॉल्स लागले असून 25 च्या वर  सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रमाची दालने आहेत असे सांगितलं. अशा  सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा विदर्भातील एम एस एम इ कडून होण्यासाठी वेंडर्सची निर्मिती व उपलब्धता होण्यास हा महोत्सव उपयोगी ठरेल  असे पार्लेवार यांनी सांगितल.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य  कार्यकारी अधिकारी डॉ .अनबलगन यांनी राज्य शासनाच्यावतीने उद्योग संवर्धनासाठी असलेल्या योजना बद्दल आणि पुढाकाराबद्दल उपस्थितांना माहिती दिली. विदर्भात डिफेन्स एअरो क्लस्टर निर्माण होण्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यात येत असून एमआयडीसी बुटीबोरी येथे ‘प्लग एन्ड प्ले ‘  या आधारे डिफेन्स आणि एरोस्पेस मध्ये क्लस्टर स्थापण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

या महोत्सवामध्ये विविध उद्योग, कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे स्टॉल्स लागले असून या प्रदर्शनाची वेळ ही सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत असणार आहे. या कार्यक्रमाला औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, अभियांत्रिकीचे विद्यार्थी, एमएसएमई एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.