विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;
मूल्य असलेले काव्यवसा भाग -1,2,3,4 ‘ हे चार काव्यसंग्रह म्हणजे विदर्भाच्या अकराही जिल्ह्यातील सहभागी 204 वैदर्भीय कवयित्रीच्या मनाचे पडलेले प्रतिबिंब होय. या ऐतिहासिक निर्मीतीची मराठी साहित्यामध्ये निश्चितच दखल घेतली जाईल.”
असे उदगार सुप्रसिद्ध साहित्यिका
डॉ.शोभाताई रोकडे यांनी काढले.
विदर्भ लेखिकांच्या वतीने विदर्भातील 204 कवायीत्रिंचा सहभाग असलेल्या काव्यवसा भाग -1, 2, 3 ,4 या चार काव्यसंग्रहाचा वैभवशाली प्रकाशन सोहळा माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान आणि विदर्भ लेखिका यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रसेन भवन ,शेगाव येथे अतिशय थाटात संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या .
याप्रसंगी मंचावर काव्यवसा प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि सुप्रसिद्ध साहित्यिक मा. पुष्पराज गावंडे ,सुप्रसिद्ध साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते,उदघाटक डॉ.विजय दूतोंडे , प्रमुख अतिथी डॉ. राजाभाऊ धर्माधिकारी ,विशेष अतिथी,हिंदी साहित्यिक मा. किशोर मिश्रा तसेच भाष्यकार डॉ.मंदाताई
नांदुरकर, प्रसिद्ध गझलकार देविका ताई देशमुख, माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विजया मारोतकर, उपाध्यक्ष विशाल देवतळे, सचिव मंगेश बावसे उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीआईच्या विदर्भ लेकी मराठी भाषेच्या संवर्धनार्थ मराठी गौरव दिनाचे औचित्य साधत श्री संत गजानन महाराज यांच्या शेगावला
27 फेब्रुवारी 22 ला एकत्रीत झाल्यात .माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान,नागपूर आणि विदर्भ लेखिका समूह यांच्या संकल्पनेतून हे आयोजन करण्यात आले.
कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंती दिनाचा मराठी भाषा गौरव दिन खऱ्या अर्थाने सार्थकी लागला. अशाच आशयाचा संदर्भ प्रत्येक मान्यवरांच्या वक्तव्यातून व्यक्त झाला.
काव्यवसा भाग एक-दोन-तीन-चार यांच्या चित्रा कृतींचे अनावरण करून प्रकाशन सोहळ्यास सुरुवात झाली .. नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रत्यक्ष प्रकाशन झाले.या एकूणच उपक्रमाबाबत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा.पुष्पराज गावंडे म्हणाले की
–“शेगावला 204 महिलांना एकत्रित उपस्थित करणे आणि हा कार्यक्रम घेणे हे खरेच एक जिकरीचे कार्य होते ,
पुस्तक निर्मिती होताच ताबडतोब त्याचे प्रकाशन होण्याचा योग घडून येतो ,हे ही एक अनोखे कार्य भासते, विजया मारोतकर यांच्या प्रचंड कार्यक्षमतेचे तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व कवयित्री चे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
“जिथे दोन बायकांना एकत्र आणणे कठीण असते अशा परिस्थितीत
विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील 204 महिलांना एकत्र आणून *काव्यवसा* उपक्रमाचे चार खंड प्रकाशित करण्याकरिता.. त्यांची मोट
बांधण्याचे कार्य करणे,खरेच अवघड आहे, जे विजया मारोतकर यांनी केलेले आहे…ते कौतुकास्पद तर आहेच परंतु आश्चर्यकारकही आहे. त्यांनी हा वसा
नुसताच मांडला नाही तर तो चमत्कारिकरित्या पूर्णत्वासही नेला.
ज्याचे सुरेख असे चित्र,आज साहित्यात उमटलेले आहे “असे मत उदघाटक
डॉ.विजय दूतोंडे यांनी प्रतिपादित केले.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉ.राजाभाऊ धर्माधिकारी म्हणाले की “पोरी जरा जपून” फेम विजया मारोतकर आमच्या परतवाड्याला या कार्यक्रमानिमित्त आल्या आणि त्यानंतर या कार्यक्रमामुळे सात मुलींचे जीव वाचले .या क्षेत्रात त्यांचे कार्य अफाट असताना आपल्या कवयित्री मैत्रिणी करता चालवलेला हा वसा पाहून मी अचंबित आहो, त्यांच्या या प्रयासाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, कारण ही संकल्पनाच अदभूत आहे, जी त्यांनी लीलया पेलली”.विशेष अतिथी शेगाव नगरीचे सांस्कृतिक व्यासपीठ असलेले हिंदी साहित्यिक मा. किशोर मिश्रा म्हणाले की-” केवळ प्रतिभावंत कविंनाच नेहमी मंच मिळतो पण विजयाताईंनी तळागाळातील कवयित्री ना समोर आणण्याचे महान कार्य केलेले आहे, त्यांची ही पुस्तके लोकांनो विकत घ्या, थोडा तुमचा खिसा खाली होऊ द्या. मराठी भाषेची तळमळ असणाऱ्या विजया मारोतकर यांच्या कार्याला पाहून मला धन्यता वाटली.”
या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानने विदर्भ लेखिकांना सोबत घेऊन इतके सुरेख आयोजन घडवून आणले. खर्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव होत आहे, हे पाहून मला या दिवसाचे सार्थक झाल्यासारखे वाटत आहे.” असे विदर्भातील ख्यातनाम गजलकार आणि ज्यांची प्रस्तावना काव्यवसा तील भाग 1ला लाभलेली आहे, अशा देविकाताई देशमुख म्हणाल्या .
-“भाष्यकार डॉ.मंदाताई नांदूरकर
काव्यवसा बाबत भाष्य करतांना म्हणाल्या की -“वैदर्भिय स्त्री जीवनाचा उभा आलेखच साकारणाऱ्या काव्यवसा उपक्रमाने एक व्रतच साकारलेले
आहे. माझ्या प्रत्येक मैत्रिणीचे कौतुक व्हावे, ती समोर यावी, याकरता विजयाताईंची ही धडपड नितांत बोलकी आहे. बोलल्याप्रमाणे त्यांनी हा वसा पूर्णत्वास नेलेला आहे. मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देते.”
एकूणच या आयोजनाची भूमिका स्पष्ट करताना विजयाताई मारोतकर म्हणाल्या की-” ही देखणी पुस्तक निर्माण करताना हे व्रत किती कठीण आहे, हे मी आर्थिक, शारीरिक, मानसिक पातळ्यांवर अनुभवले परंतु आज हे स्वरुप पूर्णत्वास आल्यामुळे बाळाच्या जन्मानंतर आईला जसा आनंद होतो, तसाच आनंद मला झालेला आहे. जो माझ्यासह, माझ्या सर्व सहभागी कवयित्रींच्या चेहऱ्यावर मला दिसत आहे. “25 डिसेंबर 2019 रोजी पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या महिलांकरता आपण पुढे येऊन काहीतरी केले पाहिजे” या भावनेतून हे व्रत स्वीकारले आणि आज दोन वर्ष दोन महिने दोन दिवस झालेत, हे स्वप्न साकार झाले, याचे मनोमन समाधान आहे.याकरीता परिस पब्लिकेशनचे प्रकाशक गिरीश भांडवलकर यांचे मनापासून सहकार्य लाभले ,हे नाकारता येत नाही.कोरोना मुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात आम्ही सर्व लॉकडाऊन होतो परंतु मनात मात्र वादळ पेलत होतो. वैदर्भीय कवयित्रींच्या मनातील वादळांना झेलणारा हा काव्यवसा एकूणच विदर्भाच्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक ,वैयक्तिक वैशिष्ट्यांना अधोरेखित करतो आहे.हे व्रत मला पूर्णत्वास नेता आले. याचे मनोमन
समाधान आहे.”
माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विशाल देवतळे संस्थेच्या वाटचाली बाबतचा आढावा घेतानाआपल्या प्रास्ताविकात म्हणाले की
-“माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने साकारत असलेला हा प्रकाशन सोहळा म्हणजे अगदी अल्पावधीतील आमचा संस्थेचा चौथीसावा कार्यक्रम होय, या साहित्यिक प्रवाहात कार्य करत असताना वैदर्भीय लेखिकां करिता काव्यवसा हा उपक्रम राबविता आला. ज्यातून आज चार काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे ,हा आमच्या करीता एक अतिशय आनंदाचा आणि अविस्मरणीय असा क्षणआहे. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य लाभले हे आमचे अहोभाग्य आहे.”
परिस पब्लिकेशन, पुणेचे प्रकाशक श्री. गिरीश भांडवलकर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की -” विजयाताईंच्या पुढाकाराने हा भव्यदिव्य असा काव्यवसा उपक्रम माझ्या पुढ्यात आला. मी धास्तावलो होतो, पण ताईंच्या सतत लाभलेल्या सहकार्यामुळे मला हा काव्यवसा पूर्णत्वास नेता आला. मी आजवर अनेक पुस्तके प्रकाशित केलीत ,परंतु हा अनुभव माझ्यासाठी नितांत वेगळा होता, जो मनोमन समाधान देऊन गेला.”
सर्व कवयित्रींना त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.”
काव्यवसाच्या चारही भागांचे नितांत समर्पक आणि सुरेख मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी तयार केलेले आहे.
पाहुण्यांचा परिचय डॉ.माधव शोभणे, डॉ.संगीता जीवनकर,विजया भांगे ,मंगेश बावसे, विद्या बनाफर ,निशा डांगे यांनी केला. याप्रसंगी काव्यवसाच्या सहसंपादक मंगला नागरे, निता बोबडे ,निशा डांगे, जयश्री कोटगीरवार, कविता कठाणे, कुसूम अलाम, विजया कडू, विद्या बनाफर, लीना भुसारी खैरकर यांना तसेच विदर्भाच्या अकराही जिल्ह्यातील सहभागी 204 कवयित्रीना
सन्मानपत्रांनी सन्मानित करण्यात आले.
विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील 204 कवयित्री एकत्रित येऊन शेगाव नगरीमध्ये असा भव्य दिव्य प्रकाशन सोहळा साकारतात, याकरिता मुख्य सम्पादक विजया मारोतकर यांचे स्थनिक लिनेस क्लबच्या अध्यक्ष डॉ.दीप्ती गोयनका यांनी मंचावर येऊन स्वागत केले तसेच या उपक्रमात सहभागी अन्य कवयित्रीचाही सन्मान केला.
प्रकाश झामरे यांनी स्वागत गीत सादर केले तर पल्लवी उमरे आणि निता अल्लेवार यांनी मराठी भाषा गीत सादर केले.सुप्रसिद्ध चित्रकार निलेश देशमुख यांनी काढलेली मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचा लोगो असलेली नितांत देखणी आणि प्रचंड मोठी रांगोळी कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका देशपांडे,कोकिळा खोदनकर ,उज्वला इंगळे, यांनी केले. आभार प्रदर्शन माय मराठी प्रतिष्ठानच्या प्रसिद्धी विभाग प्रमुख राजश्री कुळकर्णी यांनी केले.
श्री संत गजानन महाराजांच्या शेगाव नगरीत साकारलेल्या काव्यवसा च्या भव्य अशा प्रकाशन सोहळ्याला स्थानिक सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.दा.गो. काळे यांचे सह अनेक मान्यवर मंडळी ,काव्यवसा यात सहभागी सर्व कवयित्री, त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. सभागृहातील प्रचंड उपस्थितीत हा काव्यवसाचा देखणा प्रकाशन सोहळा संपन्न झाला…..

