Home वर्धा हंसराज राऊत यांची क्षेत्रीय प्रचार अधिकारी, वर्धा पदावर नियुक्ती

हंसराज राऊत यांची क्षेत्रीय प्रचार अधिकारी, वर्धा पदावर नियुक्ती

40 views
0
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, वर्धा येथील क्षेत्रीय प्रचार अधिकारी म्हणून हंसराज राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे नागपूर येथील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोच्या सहायक संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

श्री. राऊत हे भारतीय माहिती सेवेच्या २०१९ च्या तुकडीचे सिनिअर ग्रेड अधिकारी असून त्यांची प्रथम नियुक्ती सन 2019 मध्ये कोल्हापूर येथे क्षेत्रीय प्रचार अधिकारी तथा परिविक्षाधीन अधिकारी म्हणून करण्यात आली होती. यापुर्वी ते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक, माहिती व जनसंपर्क कार्यालयात सहायक संचालक पदावर कार्यरत होते. त्यांची महाराष्ट्र शासनात मुंबई, गडचिरोली व नागपूर येथे सेवा झाली आहे. ते काही वर्षे विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय, नागपूर येथील विशेष माहिती आणि जनसंपर्क कक्षाचे प्रभारी सहायक संचालक म्हणून कार्यरत होते.

प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो (महाराष्ट्र-गोवा), पुणे अंतर्गत येत असलेल्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, वर्धा या विभागाच्या अंतर्गत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. तर क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूर या विभागाच्या अंतर्गत नागपूर, भंडारा गोंदिया या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो मार्फत महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांमधील गावांमध्ये प्रचार-प्रसार अभियान राबविण्यात येतात. ग्रामपंचायत स्तरावर विविध जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले जाते. त्यात लोककला आणि कलापथक द्वारा जनजागृती, विविध शासकीय योजनांच्या विषयावर मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम, प्रदर्शन, मेळावे, डिजीटल प्रसिध्दी वाहन, बॅनर, पोस्टर, सोशल मिडीया आदींचा समावेश आहे.