Home वर्धा हिंदी विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ हिंदी ही केवळ भाषा नसून संपूर्ण संस्कृती...

हिंदी विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ हिंदी ही केवळ भाषा नसून संपूर्ण संस्कृती आहे – डॉ.विनय सहस्रबुद्धे;

92 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

वर्धा, 08 जानेवारी 2022: हिंदी भाषा आपल्याला प्रेम, आपुलकी, करुणा आणि ममता शिकवि‍ते. ही भाषा कुटुंब आणि समाज यांना एका दुव्यात बांधून पुढे जाण्याची प्रेरणा देते. या दृष्टिकोनातून हिंदी ही केवळ भाषा नसून एक संपुर्ण संस्‍कृती आहे. असे प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केले. ते आज (शनिवार, 8 जानेवारी 2022) महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करत होते. ते म्हणाले की, या विद्यापीठाने स्थापने पासूनच महात्मा गांधींचे ‘सर्व जन हिताय सर्व जन सुखाय’ हे स्वप्न साकार केले आहे. या विद्यापीठाच्या नावात गांधी, हिंदी आणि आंतरराष्‍ट्रीय असे तीन शब्द आहेत, जे विद्यापीठाची कार्यशैली, तत्त्वज्ञान आणि तत्त्वे दर्शवतात. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, आपण वेगवेगळ्या भाषा शिकतो ही चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला मातृभाषेची अधिक ओढ असायला हवी. ते म्हणाले की, भारतासारख्या देशात संस्कृती आणि शिक्षण हे दोन अविभाज्य घटक आहेत आणि ते एकमेकांना पूरक आहेत. कोणत्याही देशाच्या शिक्षण पद्धतीला समाजाच्या सांस्कृतिक निरीक्षणातूनच मार्गदर्शन मिळते. सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्‍वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, आता ही वेळ आली आहे की आपण भारताची सांस्कृतिक सभ्यता आणि विविधता समजून घेऊ आणि सार्वत्रिक विकासाला गती देऊ जेणेकरून आपले राष्ट्र नवीन उंची गाठू शकेल. अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाचे कुलाधिपती प्रो. कमलेश दत्त त्रिपाठी म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी ही एका नव्या युगाची सुरुवात आहे. आज राष्ट्रीय दृष्टीकोनातून सर्व भारतीय भाषा आणि हिंदीकडून नव्या अपेक्षा आणि त्या पूर्ण होण्याच्या अभूतपूर्व शक्यता दिसल्या, त्यामुळे आज महात्मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्याचे तेज आंतरराष्ट्रीय क्षितिजावरही स्पष्टपणे दिसून येत आहे.
कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी स्वागत भाषण व अहवाल सादर करून दीक्षांत उपदेश दिला. विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात विद्यापीठाने केलेल्या कामगिरीचे वर्णन करताना ते म्हणाले की, विद्यापीठाने स्थापनेपासून शैक्षणिक संशोधन आणि सामाजिक बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गेल्या वर्षभरातील शैक्षणिक उपक्रमांची माहिती देताना प्रो. शुक्ल म्हणाले की विद्यापीठाने आपल्या ध्येयानुसार हिंदीच्या अभ्यासासाठी परदेशातील महत्त्वाच्या संस्थांसोबत सामंजस्य करारांतर्गत कार्यक्रम सुरू केले असून, त्याअंतर्गत विविध देशांतील उच्च अधिकाऱ्यांना हिंदीचे मूलभूत शिक्षण दिले जात आहे. या योजनेद्वारे हिंदीचा आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून विस्तार केला जाणार आहे. प्रो. शुक्ल यांनी या शैक्षणिक सत्रात प्रकाशित झालेल्या दहा पुस्तकांचाही उल्लेख केला. या पुस्तकांमुळे समाजात सकारात्मक चर्चा घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाचे महानायक बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर, पं. मदन मोहन मालवीय यांच्या नुकत्याच बसवण्यात आलेल्या पुतळ्यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.
प्रो. शुक्ल यांनी सांगितले की, विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा स्वीकार केला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी अर्थपूर्ण प्रयत्नही केले आहेत. गांधीजींचे स्वावलंबन आणि स्वावलंबनाचे तत्त्वज्ञान पूर्ण करण्यासाठी विदर्भातील दहा गावांतील लोकांना सूतकताई आणि हातमागाचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी विद्यापीठाने उचललेल्या पावलांचा त्यांनी उल्लेख केला. प्रो. शुक्ल म्हणाले की विद्यापीठाने रिद्धपूर येथे मराठी भाषा आणि तत्त्वज्ञान केंद्राची स्थापना केली आहे. पूर्वेकडील राज्यांमध्ये विद्यापीठाची केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेचाही उल्लेख त्‍यांनी केला.
विद्यापीठाच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी अकादमिक भवनाच्या कस्तूरबा सभागृहात झालेल्या दीक्षांत समारंभात नीता ज्ञानदेवराव उघडे यांना कुलाधिपती स्वर्ण पदक आणि शची पांडे यांना सर्वोदया रत्नमाला तुकाराम बोरकर स्मृती सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. दीक्षांत समारंभात कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल यांनी 45 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके आणि 470 पदवीधरांना ऑनलाईन पदव्या प्रदान केल्या. पदवीधारकांमध्ये 27 विद्यार्थी पीएच.एच. डी., 44 विद्यार्थी एम.फिल., 229 विद्यार्थी पदवीधर आणि 170 विद्यार्थी पदवीपर्यंतचे आहेत.
दीक्षांत समारंभात हिंदी साहित्यातील विशेष योगदानाबद्दल कुलगुरू प्रो. शुक्ल यांनी माजी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि सुपर कॉम्प्यूटरचे शिल्पकार, प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना डी.लिट. मानद पदवी प्रदान केली. डॉ. रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि डॉ.विजय भटकर यांनी मनोगत व्यक्त केले.
 
दीक्षांत समारंभात रामटेक येथील कवी कुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांनीही संबोधित केले. यावेळी कार्यकारी व अकादमिक परिषदेचे सदस्‍य, प्रकुलगुरू प्रो. हनुमानप्रसाद शुक्ल व डॉ.चंद्रकांत रागीट, अधिष्ठाता गण, विभाग प्रमुख, कुलसचिव कादर नवाज खान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने तर वंदे मातरम या गीताने समारोप झाला. कार्यक्रमाचे संचालन कुलसचिव कादर नवाज खान दूरशिक्षण निदेशालयातील असोशिएट प्रोफेसर डॉ. प्रियंका मिश्र यांनी केले.

दीक्षांत समारंभाच्या प्रारंभी अभिनवगुप्त प्रांगणात विद्यापीठाचे ध्वजारोहण आणि दूरशिक्षण निदेशालयाच्‍या इमारतीत पं. मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याचे अनावरण कुलाधिपती प्रो. कमलेश दत्त त्रिपाठी यांच्या हस्‍ते करण्‍यात आले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला कुलाधिपती प्रो. कमलेशदत्‍त त्रिपाठी, कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल, डॉ.विनय सहस्रबुद्धे, कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रो. योगेंद्र नाथ ‘अरुण’, प्रो. श्रीनिवास वरखेडी आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.हिंदी विश्‍वविद्यालय का पंचम दीक्षांत महोत्‍सव