बोगस प्रकरणी लाखाचे बिल तयार करुन मनपाचे चार अधिकारी निलंबित

188
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर 

नागपुर – कुठल्याही प्रकारची स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी न करता केवळ अधिका-यांच्या बोगस हस्ताक्षर व त्यांच्या संगणकाच्या पासवर्डचा दुरुपयोग करुन ६७ लाखांचे बिल काढण्यात आले़ याप्रकरणी महापालिका अधिका-याच्या तक्रारीवरुन चार जणांविरोधात सदर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला़ याप्रकरणात सामील असलेल्या चार अधिका-यांना निलंबित केले असून एका निवृत्त अधिका-याविरोधात उपविभागीय चौकशी सुरु करण्यात आली़ महापालिकेत लागणारी स्टेशनरी, प्रिटिंग आदीसाठी सुदर्शन, मनोहर साकोरे अँन्ड कंपनी, स्वास्तिक ट्रेड लिंक, गुरुकृपा स्टेशनरी, एसक़े ़ इंटरप्राजेस या पाच एजन्सीला दर ठरवून दिले आहे़ विशेष म्हणजे या पाचही एजन्सी एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाने आहेत़
एजन्सीच्या चौघांनी महापालिकेतील कर्मचा-यांना हाताशी धरुन ६७ लाखांची स्टेशनरी खरेदीचे खोटे बिले सादर केली़ ६७ लाखांची ही बिले वित्त व लेखा विभागात गेली़ बिलाची शहानिशा न करता संबंधित एजन्सीला ६७ लाख रुपये देऊन या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केले़ याप्रकरणी मनपातील प्रशांत भातकुलकर यांनी बोगस बिले सादर केल्याप्रकरणी एजन्सीचे मालक पद्माकर साकोळे, सुषमा साकोळे, मनोहर साकोळे, अतुल साकोळे या चौघांविरोधात मनपाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली़ सदर पोलिस स्टेशनने ६७ लाख ८ हजार रुपयांची उचल केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला़ या प्रकरणात महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी़ यांनी चार कर्मचा-यांना निलंबित केले़
यात सामान्य प्रशासन विभागातील मोहन पडवंशी, वित्त विभागातील राजेश मेश्राम,अफाक अहमद, श्रीमती नागदिवे यांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी रात्री काढले़ याशिवाय याच विभागातील निवृत्त अधिकारी कराळे यांच्याविरोधात उपविभागीय चौकशीचे आदेश दिले़ या प्रकारामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे़