महिला आरोग्य समिती सदस्यांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन

167
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
चंद्रपूर  : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बजाज पालीटेक्निक बालाजी वॉर्ड येथे महिला आरोग्य समिती सदस्यांचे प्रशिक्षण १४ ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले असून, उदघाटन सहायक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या हस्ते झाले.

यावेळी शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, डॉ. अतुल चटकी, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा यांची उपस्थिती होती.
शहरी भागातील जनतेला विशेषतः गरीब, गरजू, दुर्लक्षित घटकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी २०१४ पासून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यरत आहे. २०१५ पासून शहरी भागातील वंचित गटामध्ये महिला आरोग्य समितीची रचना व स्थापना करण्यास सुरुवात झाली. आरोग्य सेवासंदर्भात सर्व स्तरावर लोकसहभाग वाढविण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत महिला आरोग्य समितीची रचना करण्यात आली आहे. या महिला आरोग्य समिती सदस्यांचे प्रशिक्षण १४ ते १८ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी प्रशिक्षणाचे उद्घाटन पार पडले. यावेळी कार्यक्रमात सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनात माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन आशा कार्यकर्तीच्या पर्यवेक्षक विद्या हजारे यांनी केले.