सर्वाधिक महिला ठाणेदारात मुंबईनंतर नागपुर दुस-या क्रमांकावर

542
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपुर – शहर पोलिस दलात मुंबईनंतर सर्वाधिक महिला पोलिस ठाणेदारांना नियुक्ती देण्यात आली आहे़ महिला पोलिस अधिका-यांकडे पोलिस स्टेशनचे नेतृत्व देणारे राज्यात नागपूर दुसरे आयुक्तालय आहे़ सध्या शहरात चार महिला पोलिस अधिकारी ठाणेदार म्हणून कार्यरत आहेत़ उपराजधानीत सध्या ३३ पोलिस ठाणे असून आणखी तीन प्रस्तावित आहेत़ त्यापैकी तब्बल चार ठाण्यांचे नेतृत्व महिला पोलिस अधिका-यांकडे आहे़ ठाणेदार म्हणून नियुक्ती करताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महिला व पुरुष असा भेदभाव केला नाही़ नागपूर पोलिस विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच चार महिला पोलिस अधिका-यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर नियुक्त करण्यात आले आहे़ यामध्ये वाठोडा पोलिस ठाण्याचे नेतृत्व आशालता खापरे, मानकापूर पोलिस ठाण्यात वैजवंती मांडवधरे, बजाजनगर पोलिस ठाण्यात शुभांगी देशमुख आणि वाडी पोलिस ठाण्याचे नेतृत्व ललिता तोडासे यांच्याकडे देण्यात आले आहे़ आशालता खापरे यांना शहरातील वाहतूक विभागाच्या पहिल्या महिला पोलिस इंचार्ज म्हणून मान मिळाला आहे़ त्यांनी सक्करदरा वाहतूक विभागाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे़ त्यामुळेच त्यांना वाठोडा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर नियुक्त करण्यात आले आहे़